बेळगावात उमेदवारीसाठी दहा कोटी रुपये दिलेली व्यक्ती उत्तर कर्नाटकातील असून बेळगाव लोकसभेची पोटनिवडणूक लढविण्यास इच्छुक आहे. बेळगाव लोकसभेच्या पोटनिवडणुकीची उमेदवारी मिळवून देण्यासाठी एका इच्छुकाकडून तब्बल १० कोटी रुपये उकळलेल्या युवराज नामक व्यक्तीला शहर गुन्हे अन्वेषण विभागाने अटक केली आहे. आधी शिक्षणक्षेत्रात काम केलेल्या या व्यक्तीचा काही वर्षांपूर्वी सक्रिय राजकारणात सहभाग आहे. बंगळूरचे गुन्हे शाखेचे सहआयुक्त संदीप पाटील यांनी यासंदर्भात प्रसारमाध्यमांना माहिती दिली आहे. प्रकल्पाचा ठेका मिळवून देण्यासाठी एकाने युवराजला एक कोटी रुपये दिले होते. त्या व्यक्तीला त्या कामाचा ठेका न मिळाल्याने त्याने पोलिसात तक्रार दाखल केली.
हे वाचा : मुख्यमंत्री ग्रामपंचायती जिंकण्यासाठी मैदानात
या तक्रारीनंतर पोलिसांनी युवराजला अटक करून चौकशी सुरू केली. त्यावेळी त्याच्याकडे ९१ कोटी रुपये किमतीचे तब्बल १०० धनादेश सापडले. शिवाय बेळगाव पोटनिवडणुकीची उमेदवारी मिळवून देण्यासाठी १० कोटी रुपये घेतल्याचेही उघड झाले. युवराज हा बंगळूर शहरातील नागरभावी येथील रहिवासी असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. सरकारी नोकरी, राज्यातील विविध निगम व महामंडळांचे अध्यक्षपद मिळवून देण्याचे आमिष दाखवून त्याने अनेकांना लुटल्याची माहिती चौकशीत समोर आली आहे. दरम्यान, बेळगाव लोकसभेच्या पोटनिवडणुकीसाठी युवराजला १० कोटी रुपये देणारा राजकारणी कोण, याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
हे हि वाचा : झोपेच्या आधी तुम्हीही वापरताय स्मार्टफोन तर व्हा सावधान !
दरम्यान, ती राजकारणी व्यक्ती उत्तर कर्नाटकातील आहे, इतकीच माहिती पोलिसांनी दिली असून त्या व्यक्तीचे नाव गुलदस्त्यात ठेवले आहे. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्या राजकीय व्यक्तीने युवराजकडे पैसे परत मागितले. त्यावर दहा कोटी रुपये रक्कम राज्यातील व केंद्रातील काही महत्त्वाच्या व्यक्तींना दिले असून पैसे परत मिळणार नसल्याचे युवराजने स्पष्ट केले. त्यानंतर एका अन्य व्यक्तीच्या माध्यमातून पोलिसात तक्रार दाखल केली. युवराज आपण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित असल्याचे सांगत होता. शिवाय राज्यातील प्रभावी राजकीय व्यक्तींचे निकटवर्तीय असल्याचे सांगून नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवित होता, असे पोलिसांचे म्हणणे आहे. बेळगाव लोकसभेच्या पोटनिवडणुकीची उमेदवारी मिळविण्यासाठी भाजपमधील अनेक स्थानिक नेते इच्छुक आहेत. उमेदवारी कोणाला द्यावी, याचा निर्णय पक्षाचे राज्य व राष्ट्रीय अध्यक्षच घेणार आहेत. मात्र उमेदवारी मिळविण्यासाठी एका व्यक्तीने १० कोटी रुपये खर्च केल्याने भाजपच्या स्थानिक नेत्यांमध्येही याची चर्चा रंगली आहे.