मुलीने केली महत्त्वाची मागणी
आध्यात्मिक गुरू भय्यू महाराज यांची मुलगी कुहूने इंदूरमध्ये एका हॉटेलमध्ये पत्रकार परिषद घेतली होती. ‘आईचे दागिने हे ठेवून घेण्यात आले आहे. त्याचबरोबर लॉकरच्या चाव्या सुद्धा आमच्याकडून घेण्यात आल्या आहेत. त्यामुळे मला घर सोडून हॉटेलमध्ये राहावे लागत आहे’, अशी व्यथाच कुहूने यावेळी मांडली.
हे वाचा : शिक्षण खात्याने दिले ऑनलाईन शिक्षणाबाबत मोठे स्पष्टीकरण

आध्यात्मिक गुरू भय्यू महाराज आत्महत्या प्रकरणाला आता नवीन वळण मिळाले आहे. भय्यू महाराज यांची मुलगी कुहूने संपत्तीबद्दल मागणी केली आहे. ‘वडिलांची अनेक शहरांमध्ये कोट्यवधीची संपत्ती आहे. त्यामुळे आपल्या संपत्तीचा वाटा मिळावा’, अशी मागणी कुहूने केली आहे.
याधी भय्यू महाराज यांच्या आत्महत्या प्रकरणात शुक्रवारी कुहू ही साक्षीदार आहे. या प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान कुहूने न्यायालयात माहिती दिली होती. ‘भय्यू महाराज यांच्या घराच्या किचनमधून एक मोबाईल मिळाला होता. त्यामध्ये आरोपी पलक आणि महाराज यांच्यातील चॅटिंग होती’ परंतु, याबद्दल तिच्याकडे कोणताही स्क्रीन शॉट पुरावा म्हणून नव्हता, असे वृत्त नईदुनिया या संकेतस्थळाने दिले आहे.
शुक्रवारी भय्यू महाराज यांची पत्नी आयुषी आणि बहीण अनुराधा यांनाही साक्ष नोंदवण्यासाठी हजर राहण्यास सांगितले होते. परंतु, आयुषी या हजर राहू शकल्या नाही. तसंच अनुराधा या सुद्धा उपस्थितीत नव्हत्या. अनुराधा यांनी प्रकृती ठीक नसल्याचे कारण देऊन हजर होऊ शकत नाही, असं सांगितले आहे. याआधीही साक्ष नोंदवण्यासाठी दोघींनी टाळाटाळ केली होती.
भय्यू महाराज यांनी 12 जून 2018 रोजी स्वत: वर गोळी झाडून आत्महत्या केली होती. या घटनेमुळे इंदूरसह देशात एकच खळबळ उडाली होती. भय्यू महाराज यांची एक सुसाईट नोट सुद्धा घटनास्थळावर आढळून आली होती. भय्यू महाराज यांच्या आत्महत्येनंतर सहा महिन्यांनी त्यांचा सेवादार विनायक दुधाले, शरद देशमुख आणि पलक पुराणिक यांना अटक करण्यात आली होती. भय्यू महाराज यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे. तेव्हा पासून तिघेही आरोपी जेलमध्ये आहे.
शुक्रवारी आरोपींकडून एक अर्ज न्यायालयात दाखल करण्यात आला होता. यामध्ये भय्यू महाराज यांची पत्नी आयुषी या विनाकारण न्यायालयात हजर होत नाही. एकीकडे आयुषी यांनी या प्रकरणाची सुनावणीही दुसऱ्या न्यायालयात व्हावी अशी मागणी केली आहे. तर दुसरीकडे मात्र, स्वत: न्यायालयात सुद्धा हजर होत नाही.