कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी गुजरातमधल्या अहमदाबाद प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. शुक्रवारपासून शहरात रात्री कर्फ्यू लागू केला जाणार आहे. रात्री 9 पासून ते सकाळी 6 वाजेपर्यंत हा कर्फ्यू असणार आहे. तर कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी 300 डॉक्टर्स आणि मेडिकलच्या 300 विद्यार्थ्यांना सज्ज राहण्यास सांगण्यात आलं आहे.
त्याच बरोबर 20 रुग्णवाहिका तयार ठेवण्यात आल्या आहेत. शहरातल्या सरकारी आणि खासगी हॉस्पिटल्समधले बेड्स वाढविण्यात आले आहेत.
शहरात सध्या 2600 बेड्स खाली आहेत. लोकांनी नियमांचं सक्तीने पालन करावं असं आवाहन प्रशासनाने केलं आहे. पुढच्या आदेशापर्यंत हा कर्फ्यू कायम राहणार असल्याचंही प्रशासनाने म्हटलं आहे. अहमदाबाद हे शहर कोरोनाचं हॉटस्पॉट झालं होतं. दिवाळीची गर्दी ओसरल्यानंतर आता रुग्णांची संख्या वाढण्याची भिती व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, मेड इन इंडिया कोरोना लस कोवॅक्सिन क्लिनिकल ट्रायलच्या तिसऱ्या टप्प्यात आहे. आतापर्यंत सुरुवातीच्या दोन टप्प्यातील ट्रायलमध्ये सर्वसामान्य नागरिकांचा समावेश होता. मात्र आता पहिल्यांदाच कोरोना लशीच्या ट्रायलमध्ये भारतातील मंत्रीही सहभागी होणार आहे. मेड इंडिया कोरोना लस घेण्यासाठी हरयाणाचे आरोग्यमंत्री सज्ज झाले आहेत.
हरयाणामध्ये 20 नोव्हेंबरपासून कोवॅक्सिन लशीचं ट्रायल सुरू होतं आहे. तिसऱ्या टप्प्यातील ट्रायलमध्ये हरयाणाचे आरोग्यमंत्री अनिल विजदेखील सहभागी होणार आहेत. आपण ही लस घेणार माहिती राज्याचे आरोग्यमंत्री अनिल वीज यांनी दिली आहे. आरोग्यमंत्र्यांनी ट्वीट करून ही माहिती दिली आहे.
भारत बायोटेक आणि इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (ICMR) तयार केलेली ही लस. या लशीचं तिसऱ्या टप्प्यातील ट्रायल सुरू आहे. सुरुवातीला ही लस पुढील वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीपर्यंत येण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र त्याआधीच ही लस लाँच केली जाणार आहे, अशी माहिती आयसीएमआरचे शास्त्रज्ञ आणि कोव्हिड टास्क फोर्सचे सदस्य रजनी कांत यांनी याआधी दिली होती.