ऍसिडने जाळलेल्या प्रेयसीचा दुर्दैवी मृत्यू

बीड -पुण्यात लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये रहात असलेली तरुणी दिवाळीसाठी गावी आली असता तरुणीच्या प्रियकराने तिच्यावर ऍसिड हल्ला करत जीवंत जाळण्याचा प्रयत्न काल लक्ष्मी पुजनाच्या दिवशी केल्याची घटना घडली. या घटनेने संपुर्ण जिल्हा हादरून गेला. ऍसिड हल्ला आणि पेट्रोल हल्ल्यात जळालेल्या तरुणीवर उपचार चालू असताना तिचा आज सकाळी रुग्णालयात उपचार घेत असताना दुर्दैवी मृत्यू झाला. या प्रकरणातील आरोपी अद्याप फरार असून सदरची घटना ही बीड जिल्ह्यातील येळंबघाट येथे काल घडली. आज तरुणीचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.
नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्यामधील शेळगाव येथील सावित्रा (वय २२) ही गेल्या काही महिन्यांपासून अविनाश राजुरे या तरुणासोबत पुणे येथे रिलेशनशीपमध्ये रहात होती. दि. १३ नोव्हेंबर रोजी हे दोघे पुण्याहून गावी मोटारसायकलवर परतत होते मात्र प्रियकराने सावित्रा हिच्या अंगावर ऍसिड टाकून तिच्या अंगावर पेट्रोल ओतून तिला जाळून मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना काल लक्ष्मीपुजनाच्या दिवशी घडली. यातील प्रियकराने तिला बीड तालुक्यातील येळंबघाट शिवारातील एका खड्ड्यामध्ये फेकून दिले होते. जखमी अवस्थेतील तरुणीला काही लोकांनी पाहिल्यानंतर याची माहिती नेकनूर पोलिसांना कळविण्यात आली. पोलिसांनी घटना-स्थळी येऊन तिला जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारा दरम्यान तरुणीचा पहाटेच्या दरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला. घटनेची माहिती मुलीच्या घरच्या लोकांना झाल्यानंतर तिचे घरचे लोक आज सकाळी जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल झाले होते. या प्रकरणी आरोपीविरोधात नेकनूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अद्याप आरोपी फरार असून त्याचा शोध पोलिस घेत आहे.

error: Content is protected !!