बँकेने त्यांच्या ग्राहकांना असा इशारा दिला आहे, सोशल मीडियावर येणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या फेक मेसेजपासून सावधानता बाळगा. दिवाळीआधी ऑनलाइन होणाऱ्या फसवणुकीपासून सजग राहणे ग्राहकांचे कर्तव्य आहे आणि याबाबत बँकेकडून वेळोवेळी ग्राहकांना अलर्ट पाठवण्यात आला आहे. बँकेने असे म्हटले आहे की, फसवणूक करणारे भामटे सोशल मीडियावर बनावट मेसेज पाठवत आहे, बँकेकडून त्यांच्या ग्राहकांना असे मेसेज पाठवले जात नाही आहेत. सणासुदीच्या काळात फसवणुकीचे प्रमाण देखील वाढते. दिवाळीमध्ये देखील ऑफर्सच्या नावाखाली असे काही फेक मेसेज देखील ग्राहकांना पाठवले जातात. देशातील सर्वात मोठी बँक असणाऱ्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या 42 कोटी ग्राहकांपैकी जर तुम्ही एक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे.
एसबीआयने याबाबत ट्वीट करून माहिती दिली आहे. बँकेने असे म्हटले आहे की, ‘ SBI ग्राहकांना अशी विनंती करते की सोशल मीडियावर अलर्ट राहा आणि कोणत्याही प्रकारच्या चुकीच्या किंवा बनावट मेसेजच्या जाळ्यात अडकू नका.’ बँकेने पाठवलेल्या या मेसेजकडे दुर्लक्ष केल्यास तुम्हाला नुकसान सहन करावे लागू शकते. कोरोना काळात अशाप्रकारच्या अनेक घटना समोर आल्या आहेत की ग्राहकांकडून त्यांचे पैसे लंपास झाले आहेत.
SBI तसंच देशातील इतर सर्वच बँकांच्या ग्राहकांनी त्यांची वैयक्तिक माहिती आणि बँकिंग माहिती कोणत्याही व्यक्तीबरोबर शेअर करू नका. असे केल्यास तुमच्या खात्यातील रक्कम चोरली जाऊ शकते. बँकेने अशी माहिती दिली आहे की एटीएम पिन, कार्ड नंबर, अकाउंट नंबर आणि ओटीपी कधीही कुणाबरोबर शेअर करू नका.
एसबीआयने याआधी त्यांच्या नावाने सुरू झालेल्या बनावट वेबसाइट विषयी देखील ग्राहकांना अलर्ट केले होते. बँकेने अशी माहिती दिली होती SBI ग्राहकांनी या वेबसाइट संदर्भात येणाऱ्या नोटिफिकेशन बाबत अलर्ट राहणे गरजेचे आहे. अशा वेबसाइट ग्राहकांना त्यांचे पासवर्ड किंवा खात्यासंदर्भातील माहिती अपडेट करण्यास सांगतात.
ग्राहकांना एसबीआयच्या विविध अॅक्टिव्हिटी आणि सोयी-सुविधांबाबत माहिती मिळावी याकरता बँकेकडून ट्विटरवर वेळोवेळी माहिती अपडेट केली जाते, त्याचप्रमाणे तुमच्या रजिस्टर्ड मोबाइल क्रमांकावर मेसेज देखील पाठवला जातो. जेणेकरून बँकेसंदर्भातील अलर्ट वेळोवेळी तुम्हाला मिळतील.
तुम्हाला तुमच्या एसबीआय खात्यातील बॅलन्स तपासायचा आहे तर तुम्हाला रजिस्टर्ड मोबाइल क्रमांकावरून 9223766666 या क्रमांकावर मिस्ड कॉल द्यावा लागेल. त्याचप्रमाणे SMS च्या माध्यमातून शिल्लक रक्कम जाणून घेण्यासाठी 09223766666 या क्रमांकावर BAL असा मेसेज पाठवलात की तुम्हाला हवी असलेली माहिती मिळेल. याकरता तुमचा मोबाइल क्रमांक एसबीआयमध्ये रजिस्टर्ड असणे अत्यावश्यक आहे.