राज्यात भाजपाकडून आणीबाणीची आठवण करुन देणारी परिस्थिती निर्माण झाली असल्याची टीका केली जात आहे. भाजपचे माजी खासदार नीलेश राणे यांनी एका जुन्या घटनेची आठवण करून देत स्वतःला अटक करणार का ? अशी विचारणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना केली आहे. रिपब्लिक वाहिनीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांच्यावर करण्यात आलेल्या अटकेच्या कारवाईनंतर या वादाला तोंड फुटले आहे.
दरम्यान नीलेश राणे यांनी उस्मानाबादमधील दिलीप ढवळे आत्महत्येसंबंधीच्या बातम्यांचे स्क्रीनशॉट ट्विटरला शेअर केले आहेत. “कराल काय स्वतःला अटक? न्या स्वतःला फरफटत. दाखवून द्या न्याय सगळ्यांसाठी एक असतो,” असं नीलेश राणे यांनी यावेळी पोस्टमध्ये म्हटलं आहे.
दिलीप ढवळे यांच्या कुटुंबियांनी उस्मानाबाद येथे गुरुवारी पत्रकार परिषद घेऊन रखडलेल्या या तपासावर संताप व्यक्त केला. अन्वय नाईक यांच्या आत्महत्या प्रकरणी तत्परतेने तक्रारीची दखल घेतली तसेच दिलीप ढवळे यांच्या आत्महत्येस जबाबदार असणाऱ्या शिवसेना खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यासह इतर आरोपींवर तात्काळ कारवाई करण्यात यावी अशी मागणी आत्महत्याग्रस्त दिलीप ढवळे यांच्या पत्नींनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. अन्वय नाईक यांना न्याय, तर आम्ही काय घोडे मारले आहे ? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
ढवळे यांनी सुसाईड नोटमध्ये ओमराजे निंबाळकर आणि वसंतदादा बँकेचे अध्यक्ष विजय दंडनाईक या दोघांनी चार एकर जमिनीवर बोजा चढविण्यास भाग पाडले असल्याचे लिहिले होते. त्यांनी केलेल्या फसवणुकीमुळे आत्महत्येची वेळ आली. आपल्या नावे घेतलेली सर्व रक्कम कारखान्यासाठी वापरण्यात आली. हमी देऊनही परतफेड न केल्यामुळे जमिनीचा तीन वेळा लिलाव पुकारला गेला. सततचा दुष्काळ आणि केलेली फसवणूक यामुळे आपण आत्महत्या करीत असल्याचेही त्यात लिहिले होते.