बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारने याबाबत ट्विट करून माहिती दिली आहे. या गेमचा एक अधिकृत सिनेमॅटिक टीजरही जाहीर करण्यात आला आहे. भारतात तुफान गाजलेला चीनी मोबाईल गेम PUBG बॅन करण्यात आल्यानंतर आता भारतीय बनावटीच्या FAU-G गेमची (android game)घोषणा करण्यात आली आहे.
FAU-G याचा अर्थ फियरलेस अँड युनायटेड – गार्ड्स असा आहे. FAU-G गेमचा पहिला एपिसोड गलवान खोऱ्यातील घटनेवर आधारित आहे, जो गेमच्या टिजरमध्ये दाखवण्यात आला आहे. FAU-G मध्ये प्लेयर्स भारतीय सैन्याच्या रुपात दिसणार आहेत.
FAU-G गेम (android game) भारतीय गेम डेव्हलपर कंपनी nCore Games ने तयार केला आहे. nCore Games चे संस्थापक आणि प्रमुख विशाल गोंडल यांनी सांगितलं की, हा FAU-G गेम, पबजीला रिप्लेस करेल आणि पबजी ज्याप्रमाणे लोकप्रिय होता, तसाच हादेखील लोकल आणि ग्लोबल स्तरावर लोकप्रिय होईल.
या गेममधून होणाऱ्या कमाईचा 20 टक्के हिस्सा ‘भारत के वीर’ ट्रस्टला जाईल, अशी माहिती अक्षय कुमारने एका ट्विटद्वारे दिली. ‘भारत के वीर’ ही भारतीय सैन्यातील जवानांना समर्पित एक संस्था असून याची स्थापना गृह मंत्रालयाकडून करण्यात आली आहे.
भारत-चीनमधील संघर्ष आणि अनेक चीनी ऍप्सवरील बॅननंतर 4 सप्टेंबर रोजी FAU-G गेमची घोषणा करण्यात आली होती. FAU-G गेम आत्मनिर्भर भारतचा भाग असल्याचं विशाल गोंडल यांनी सांगितलं. FAU-G येत्या आठवड्यात नोव्हेंबर 2020 मध्ये रिलीज होण्याची शक्यता आहे.