१ हजारात धमकी देणे, ५ हजारात मारणे तर हत्या करण्यासाठी…हेच बघायचं बाकी होतं!

मुजफ्फरनगर – सोशल मीडियाचा जसा चांगला वापर केला जातो, तसा गैरवापर करणारेही अनेक महाभाग आपल्याला सापडतील. असाच एक किस्सा सध्या सोशल मीडियात चांगलाच व्हायरल झाला आहे. भाईगिरीचा शौक असलेली मुलं बऱ्याचवेळा सोशल मीडियातून दहशत पसरवण्याचा प्रयत्न करतात. सध्याच्या युगात सोशल मीडियाच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत काही मिनिटातच पोहचता येते.

मध्यंतरी टिकटॉकसारख्या माध्यमातून असे अनेक युवक पुढे आले, कोणी हातात गन घेऊन शूट करत होतं तर कोणी तलवार..अनेकांनी या माध्यमातून फेमस होण्याचा प्रयत्न केला होता. तलवारीने केक कापण्याचे व्हिडीओ खूपदा पाहिले असतील, आम्ही तुम्हाला एका फोटोबाबत सांगत आहोत, ज्याची चर्चा सोशल मीडियात सुरु आहे. मात्र या फोटोने पोलिसांची झोप मात्र उडाली आहे. हा फोटो उत्तर प्रदेशातील मुजफ्फरनगर जिल्ह्यातील चरथावल पोलिस स्टेशनच्या हद्दीतील एका युवकाचा आहे.

या युवकाने त्याच्या फेसबुक अकाऊंटवर हातात पिस्तूल घेऊन फोटो अपलोड केला आहे. त्याने गुंडागिरीच्या कामाची आपली यादीही सोशल मीडियावर अपलोड केली आहे. त्या छायाचित्र सोबतच गुंडगिरी करण्यासाठी किती पैसे घेतले जातील याची यादीच तरूणाने सोशल मीडियावर प्रसिद्ध केली आहे, ज्यामध्ये मारणे, धमकी देणे, जखमी करणे आणि ठार मारण्याचा दर काय असेल हे या यादीत मेन्शन केले आहे. गुंडगिरीच्या या रेटचा फोटो सोशलवर मीडियावर व्हायरल झाल्यामुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

हातात पिस्तुल घेऊन युवकाने सोशल मीडियावर त्याच्या कामाची यादी टाकली आहे, यात धमकी देण्यासाठी एक हजार रुपये, एखाद्याला मारण्यासाठी ५ हजार रुपये, गंभीर जखमी करण्यासाठी दहा हजार रुपये आणि ५५ हजार रुपयांमध्ये ठार करण्यासाठी घेतले जातील असे दरपत्रक प्रसिद्ध केले आहे. खरं तर, जिल्ह्यात सोशल मीडियावर उघडपणे दहशत पसरवण्याचं दरपत्रक प्रसिद्ध करण्याची ही पहिलीच घटना आहे. ज्यामुळे पोलिसांनी या पोस्टच्या आधारे तपास सुरू केला आहे.

पोलिसांनी ही फेसबुक पोस्ट टाकणाऱ्या तरुणाचा तपास केला असता, तो चरथावल पोलीस स्टेशन परिसरातील चौकाडा गावचा रहिवासी असल्याचं आढळून आलं. सीओ सदर कुलदीप कुमार म्हणाले की, इंटरनेटवर हातात पिस्तुल घेऊन दहशत पसरवणारी पोस्ट केल्याचं समोर आलं, या प्रकरणाचा तपास केला जात असून लवकरच यात तरुणावर कारवाई केली जाईल, फोटोमध्ये दिसणारा तरूण पीआरडी जवानचा मुलगा असल्याचं सांगण्यात येत आहे, याचीही चौकशी सुरू आहे.

error: Content is protected !!