नवी दिल्ली : ज्या व्हिडिओमुळे प्रसिद्धी मिळाली होती तो व्हिडिओ अपलोड करणाऱ्या यू-ट्युबर गौरव वासन याच्याविरोधात कांता प्रसाद यांनी पोलिसांत फसवणुकीची तक्रार दाखल केली आहे. आपलं नाव आणि व्हिडिओ दाखवून लोकांकडून मदत गोळा करून फसवणूक केल्याचा आरोप कांता प्रसाद यांनी गौरवविरोधात केला आहे. राजधानी दिल्लीत काही एका यू-ट्युब व्हिडिओमुळे प्रचंड चर्चेत आलेले ‘बाबा का ढाबा’चे मालक कांता प्रसाद आता पुन्हा चर्चेत आले आहेत.
कांता प्रसाद यांचा आरोप
दक्षिण दिल्लीच्या मालवीय नगर भागात ‘बाबा का ढाबा’ नावाचं भोजनालय आहे. काही दिवसांपूर्वी इन्स्टाग्राम इन्फ्लुएन्सर आणि यू-ट्युबर गौरव वासन याने बाबा का ढाबा आणि कांता प्रसाद यांचा एक व्हिडिओ अपलोड केला होता. या व्हिडिओत लॉकडाऊन दरम्यान दुकान न चालल्यानं आर्थिक अडचणींचा सामना करावा लागल्याचं कांता प्रसाद यांनी म्हटलं होतं. वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रसिद्धी मिळाल्यानं अचानक भोजनालय आणि त्याच्या मालकालाही प्रसिद्धी मिळाली होती. त्यानंतर ‘बाबा का ढाबा’समोर लोकांच्या रांगा लागलेल्याही दिसल्या.
कांता प्रसाद यांनी पोलिसांत दाखल केलेल्या तक्रारीप्रमाणे, गौरव वासन याने आपला व्हिडिओ शूट करून तो ऑनलाईन पोस्ट केला. या व्हिडिओतून त्यानं सोशल मीडियावर जनतेला पैशांच्या मदतीचीही मागणी केली. गौरव यानं जाणून-बुजून मदत गोळा करण्यासाठी आपल्या कुटुंबीय आणि मित्रांच्या बँकेचा अकाऊंट क्रमांक आणि मोबाईल क्रमांक दात्यांसोबत शेअर केला. आपल्याला याबद्दल कोणतीही माहिती न देता गौरव यानं वेगवेगळ्या माध्यमांतून दात्यांकडून मोठ्या प्रमाणात मदतराशी गोळा केल्याचंही कांता प्रसाद यांनी म्हटलंय.
गौरव वासन याचं स्पष्टीकरण
याच दरम्यान गौरव वासन यानं आपल्या यू-ट्युब चॅनलवर आणखी एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत त्यानं आपण कोणत्याही प्रकारे कुणाचीही फसवणूक केली नसल्याचं म्हटलंय. तसंच आपलं म्हणणं सिद्ध करण्यासाठी लवकरच आपले बँकेचं व्हिरिफाईड स्टेटमेंट अपलोड करणार असल्याचंही गौरवनं म्हटलंय.