पुण्यात काँग्रेसच्या माजी नगरसेविकेच्या पतीची गळफास घेऊन आत्महत्या

पुणे : काँग्रेसच्या माजी नगरसेविका नीता परदेशी-रजपूत यांच्या पतीने लॉ कॉलेज रस्त्यावरील कार्यालयामध्ये मध्यरात्री गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. त्यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून लॉकडाऊनच्या काळात मोठा आर्थिक फटका बसल्याने त्यांची हे कृत्य केले असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. जयंत रजपूत (रा. खजिना विहीर) असे त्यांचे नाव आहे़ याप्रकरणी डेक्कन पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्युची नोंद करण्यात आली आहे.

हे वाचा : अभिनेत्री केला धक्कादायक खुलासा, त्या रात्री नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार, जयंत यांच्या पत्नी नीता रजपूत या काँग्रेसच्या माजी नगरसेविका आहेत. जयंत रजपूत यांचे औषधाचे कारखाने हिमाचल प्रदेश तसेच पुण्यात आहेत. लॉ कॉलेज रोडवरील कांचन गल्लीत त्यांचे कार्यालय आहे. काल रात्री ते उशिरापर्यंत घरी आले नाही. तसेच मोबाईलही उचलत नसल्याने त्यांचा मुलगा कार्यालयात आला. कार्यालय आतून बंद होते. त्यामुळे त्याने मागील बाजूने जाऊन पाहिले. तेथील लाकडी दरवाजा तोडून आत प्रवेश केल्यावर जयंत रजपूत यांनी गळफास घेतल्याचे आढळून आले.त्यांनी तातडीने रुग्णालयात नेले. परंतु, डॉक्टर तपासणीपूर्वीच त्यांचा मृत्यु झाला होता़ त्यांनी डेक्कन पोलिसांना याची माहिती दिली़ डेक्कन पोलीस अधिक तपास करीत आहेत.

error: Content is protected !!