मुंबई: सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्येच्या प्रकरणावरून मुंबई पोलिसांच्या भूमिकेवर संशय व्यक्त करणाऱ्या भाजप नेत्यांवर काँग्रेसनं जोरदार हल्लाबोल केला आहे. ‘बिहार निवडणुकीच्या राजकारणापायी तेथील पोलिसांचं गुणगाण करून मुंबई पोलिसांना बदनाम करणाऱ्या भाजप नेत्यांचा महाराष्ट्रद्रोह उठून दिसत आहे,’ अशी घणाघाती टीका काँग्रेसनं केली आहे.
सुरुवातीला बॉलिवूडमधील आरोप-प्रत्यारोपांपुरते मर्यादित असलेल्या सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणाला आता पुरते राजकीय वळण आले आहे. भाजपनं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना यात ओढून सीबीआय चौकशीची मागणी सातत्यानं लावून धरली होती. बिहार सरकारनंही या प्रकरणात रस दाखवत परस्पर सीबीआय चौकशीची शिफारस केली. बिहारचे पोलीस अनेकदा तपासासाठी मुंबईत येऊन गेले. भाजपचे नेते रोजच्या रोज वेगवेगळे आरोप करत आहेत. मुंबई पोलिसांवर दबाव असल्याचा आरोप करत आहेत.
आशिष शेलार यांनी आजही सुसान वॉकर या महिलेचा हवाला देत मुंबई पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. वॉकर या महिलेच्या आधारावर पोलिसांनी सुशांतनं आत्महत्या केल्याचा निष्कर्ष कसा काढला, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
आक्रमक झालेल्या भाजपला आता शिवसेनेबरोबरच काँग्रस, राष्ट्रवादीनंही उत्तर देण्यास सुरुवात केली आहे. सत्यजित तांबे आणि रोहित पवार यांनी युवा नेत्यानंतर आता महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी भाजप नेत्यांना लक्ष्य केलं आहे. ‘बिहार निवडणुकीच्या राजकारणासाठी भाजपचे महाराष्ट्रातील नेते तिथल्या पोलिसांचे गुणगान करून मुंबई पोलिसांना बदनाम करत आहेत. यातून त्यांचा महाराष्ट्र द्रोह उठून दिसत आहे. ही मंडळी अत्यंत खालच्या पातळीवर उतरू शकतात. भाजपा महाराष्ट्राच्या राजकीय परंपरेला लागलेला कलंक आहे,’ अशी खरमरीत टीका सावंत यांनी केली आहे.