ही घटना म्हणजे आपण किती हलक्या आणि क्रूर प्रवृत्तीचे झालो आहोत याचं प्रतिबिंब आहे. आपण महिलांना नीट वागवण्यात पुन्हा एकदा अपयशी ठरलो आहोत.” “हाथरसमधील घृणास्पद गुन्ह्याला आपण फक्त दलितविरोधी अपराधापर्यंत मर्यादित करुन ठेवायला नको.
CNN न्यूज 18 वृत्तवाहिनीच्या वरिष्ठ राजकीय संपादक पल्लवी घोष यांनी हाथरस बलात्कार घटनेच्या पार्श्वभूमीवर हे ट्वीट केलं. या ट्वीटला उत्तर देताना ‘न्यूजलाँड्री’ या संकेतस्थळाचे सहसंस्थापक अभिनंदन शेखरी यांनी म्हटलं, “जातीचा उल्लेख म्हणजे गुन्ह्याला मर्यादित करणं नाही. अशा बऱ्याच गुन्ह्यांच्या केंद्रस्थानी असलेल्या जातीच्या अंगाबाबत आपण बहिरे होऊ शकत नाही.”
ट्विटरवर पल्लवी घोष यांच्या ट्वीटमुळे किंवा इतर अशाच ट्वीटमुळे बलात्कार पीडितेच्या जातीच्या उल्लेखाबाबत खूप चर्चा झाली आणि अजूनही होताना दिसते आहे.
केवळ ट्विटरवरील वरिष्ठ पत्रकारांच्या या चर्चांमुळेच नव्हे, तर एकूणच बलात्काराच्या घटनांनंतर अनेकदा अशा चर्चा होतात. जातीचा उल्लेख व्हावा की नको आणि उल्लेख झाल्यास संबंधित घटनेच्या न्यायालयीन प्रक्रियेवर काही परिणाम होतो का, या प्रश्नांची प्रामुख्यानं आपण उत्तरं शोधण्याचा प्रयत्न या बातमीतून करणार आहोत.