चेन्नई | कोरोना व्हायरसवर कोरोनिल परिणामकारक औषध असल्याचा दावा योगगुरू बाबा रामदेव यांच्या पतंजलीकडून करण्यात आला होता. मात्र या कोरोनिल औषधाचा दावा पतंजलीच्या चांगलाच अंगलट आला आहे. औषधाचा दावा अन् नफेखोरी केल्याप्रकरणी आता मद्रास उच्च न्यायालयानं पतंजली आयुर्वेद व दिव्य योग मंदिर ट्रस्टला तब्बल 10 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.
चेन्नईमधील मे. अरूद्र इंजिनीयर्स प्रा. लि. या कंपनीनं आपल्या ट्रेडमार्कचा भंग केल्याप्रकरणी पतंजली विरोधात न्यायालयात दावा केला होता. यावर निर्णय देत अखेरीस न्यायालयानं पतंजलीला 10 लाखांचा दंड ठोठावला आहे.
कोरोनिल 213’ एसपीएल आणि ‘कोरोनिल 92’ बी हे आमचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहेत. गेली 30 वर्ष या नावानं आपण औद्योगिक सफाई रसायनं विकत आहोत, असा या कंपनीनं दावा केला होता.
औषधावरील मनाई हुकूम उठविण्यासाठी पतंजलीनं केलेला अर्ज न्यायालयानं फेटाळला. निकालपत्रात म्हटलं आहे की, लोकांच्या मनातील भीतीचा गैरफायदा घेत कोरोनिल औषध गुणकारी असल्याचा दावा करून पतंजली नफ्याच्या मागे धावत आहे. कोरोनिल हे कोविड 19 वरील उपचार नसून केवळ प्रतिकारशक्ती वाढविणारे औषध आहे.