नवी दिल्ली | जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल गिरीश चंद्र मुर्मू यांनी काल आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. २४ तास पूर्ण होत नाही तेच मोदी सरकारने त्यांना एक नवीन जबाबदारी दिली आहे. मुर्मू यांना देशाच्या CAG (Comptroller and Auditor General of India) पदी नियुक्त करण्यात आले आहे.
केंद्रातील मोदी सरकारने गुरुवारी याची सूचना जारी केली आहे. मुर्मू हे राजीव महर्षी यांची जागा घेणार आहेत. २०१७ साली राजीव महर्षी यांना CAG पदी नियुक्त केले होते. त्यांचा कार्यकाळ ३ वर्षांचा होता. ६० वर्ष वय असलेले मुर्मू हे १९८५ च्या तुकडीचे आयएएस अधिकारी आहेत.ते गुजरात कॅडर अधिकारी आहेत.
मुर्मू यांनी ३१ ऑक्टोबर २०१९ रोजी जम्मू-काश्मीरचे पहिले लेफ्टनंट राज्यपाल म्हणून कार्यभार सांभाळला होता. त्यांनी बुधवारी राज्यपाल पदाचा राजीनामा दिला होता. त्यांनी ९ महिने हा कार्यकाळ सांभाळला. मुर्मू हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विश्वासातील अधिकारी मानले जातात. मोदी जेव्हा गुजरातचे मुख्यमंत्री होते, तेव्हा ते त्यांचे प्रमुख सचिव होते.