राजस्थानचा थरारक विजय ; राहुल टेवाटियाचा चमत्कार

राजस्थानला स्टीव्हन स्मिथ आणि संजू सॅमसनच्या भागीदारीने चांगला पाया रचला. स्मिथ आऊट झाल्यानंतर खेळायला आलेल्या राहुल टेवाटियाला सुरुवातीच्या 20 मिनिटात 23 बॉलमध्ये 17 रन्स करता आले. यामुळे सोशल मीडियावर आणि कॉमेंट्रीदरम्यानही त्याच्यावर जोरदार टीका करण्यात आली. रनरेट प्रति ओव्हर 16च्या पुढे गेलेला असताना टेवाटियाने 18व्या ओव्हरमध्ये तब्बल 5 षटकार लगावत मॅचचं पारडं फिरवून टाकलं. वेस्ट इंडिजच्या शेल्डॉन कॉट्रेलच्या बॉलिंगवर मैदानात विविध दिशेला 5 षटकार खेचत टेवाटियाने मॅच फिरवली.

टेवाटिया 31 बॉलमध्ये 53 रन्स करून आऊट झाला. मात्र त्यानंतर जोफ्रा आर्चरनेही षटकारांची लयलूट केली. शेवटच्या ओव्हरमध्ये अवघ्या दोन रन्स हव्या असताना रायन पराग आऊट झाला. मात्र टॉम करनने जोरदार चौकार खेचत राजस्थानच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. स्टीव्हन स्मिथच्या 27 चेंडूत 50 रन्स आणि संजू सॅमसनने केलेल्या 42 चेंडूत 85 धावांच्या जोरावर राजस्थानने विजयाचा पाया रचला होता. टेवाटियाने या पायावर कळस चढवत राजस्थानला संस्मरणीय विजय मिळवून दिला.

दरम्यान त्याआधी पंजाबच्या मयांक अगरवालने दिमाखदार शतकी खेळी केली. मयांकने चौकार षटकारांची लयलूट करत 45 बॉलमध्येच शतकाची नोंद केली. मयांकने 10 चौकार आणि 7 षटकारांच्या बळावर 51 बॉलमध्ये 107 रन्सची खेळी सजवली.

मयांक आणि लोकेश राहुल जोडीने पहिल्या विकेटसाठी 183 रन्सची मॅरेथॉन भागीदारी केली. आयपीएल स्पर्धेत पहिल्या विकेटसाठाची ही तिसरी सर्वोत्तम भागीदारी आहे.पंजाबने या भागीदारीच्या बळावर 223 धावांचा डोंगर उभारला. राहुलने 54 बॉलमध्ये 7 चौकार आणि एका षटकारासह 69 रन्सची खेळी केली.

आयपीएल स्पर्धेतलं मयांकचं हे पहिलंच शतक आहे. या स्पर्धेतलं हे 65वं शतक आहे.

याआधी मनीष पांडे, युसुफ पठाण, मुरली विजय, पॉल वल्थाटी, सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग, अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा, सुरेश रैना, वृद्धिमान साहा, विराट कोहली, संजू सॅमसन, ऋषभ पंत, अंबाती रायुडू या भारतीय बॅट्समननी शतकं झळकावली आहेत.कॅप्टन, कीपर आणि ओपनर अशी तिहेरी भूमिका सांभाळणाऱ्या राहुलने बेंगळुरूविरुद्ध शानदार शतकी खेळी साकारली. या तडाखेबंद खेळीच्या बळावर पंजाबने बेंगळुरूवर 97 रन्सनी दणदणीत विजय मिळवला होता.

शारजाच्या मैदानावर पिचपासून बाऊंड्रीपर्यंतचं अंतर कमी आहे. या भौगौलिक गोष्टीचा फायदा उठवत मयांकने राजस्थानच्या बॉलर्सचा खरपूस समाचार घेतला.

error: Content is protected !!