मोदी सरकारविरोधात शरद पवार आक्रमक; आज दिवसभर अन्नत्याग

मुंबई: केंद्र सरकारनं बहुमताच्या जोरावर मंजूर करून घेतलेल्या कृषी विधेयकाच्या मुद्द्यावर राष्ट्रवादी काँग्रेसनं आक्रमक भूमिका घेतली आहे. कृषी विधेयकाला विरोध केल्यामुळं निलंबित करण्यात आलेल्या राज्यसभा सदस्यांच्या समर्थनार्थ एक दिवस अन्नत्याग आंदोलन करणार असल्याची घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे.

केंद्र सरकारनं आणलेल्या कृषी विधेयकांना राज्यसभेत जोरदार विरोध झाला होता. विधेयकाला विरोध करत सदस्यांनी चर्चेची मागणी केली होती. त्यावेळी घोषणाबाजी करण्यात आली. या प्रकरणी आठ खासदारांना निलंबित करण्यात आलं आहे. त्यामुळं काँग्रेससह सर्वच विरोधी पक्ष आक्रमक झाले आहेत. खासदारांचे निलंबन मागे न घेतल्यास उर्वरित कामकाजावर बहिष्कार घालण्याचा इशारा काँग्रेसनं दिला आहे. यापुढं जाऊन निलंबित खासदारांनी संसद भवनाच्या आवारातील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर आंदोलन सुरू केलं आहे. राज्यसभेचे उपसभापती हरिवंश नारायण सिंह हेही आंदोलनात सहभागी झाले आहेत.

मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत शरद पवार यांनीही निलंबित खासदारांना पाठिंबा दर्शवला. तसंच, आपण स्वत:ही आज दिवसभर उपोषण करणार असल्याचं शरद पवार यांनी जाहीर केलं. ‘सरकारला लवकरात लवकर हे विधेयक मंजूर करून घ्यायचं होतं. मात्र, सभागृहातील अनेक सदस्यांना विधेयकाबाबत प्रश्न होते. मात्र, सरकारला चर्चा नको होती. सरकारला विधेयक रेटून न्यायचं होतं, असं प्रथमदर्शनी दिसतं,’ असं शरद पवार म्हणाले.

‘कृषी विधेयकावर सत्ताधाऱ्यांनी राज्यसभेत जी भूमिका घेतली होती ती नियमाविरोधात होती असं विरोधी सदस्याचं म्हणणं होतं. सभापतींसमोरच्या मोकळ्या जागेत येऊन सदस्य नियमांचं पुस्तक दाखवत होते. मात्र, त्याकडं दुर्लक्ष करण्यात आलं. त्यामुळं संतापून जाऊन सदस्यांनी ते पुस्तक फाडलं. उपसभापतींनी विरोधी सदस्याचं म्हणणं किमान ऐकून घेणं अपेक्षित होतं. मात्र, तसं न करता मतदान घेण्यात आलं,’ असंही पवार म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!