नवी दिल्ली :संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वीच काँग्रेसनं सरकारवर दबाव टाकण्याचा प्रयत्न सुरू केलाय. राहुल गांधी यांनी सोमवारी पुन्हा एकदा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केलाय. पावसाळी अधिवेशनात सरकारवर दबाव टाकण्यासाठी काँग्रेसकडून आक्रमक प्रयत्न केला जाणार, याची झलकच सोशल मीडियातून राहुल गांधींनी दाखवून दिलीय. ‘मोदी सरकारनं म्हटलंय आत्मनिर्भर बना म्हणजेच तुमचा जीव तुम्ही स्वत:च वाचवा कारण पंतप्रधान मोरांसोबत व्यग्र आहेत’ असं म्हणत शेलक्या शब्दांत राहुल गांधींनी मोदी सरकारवर टीका केलीय.
करोना संक्रमणाचे आकडे या आठवड्यात ५० लाख आणि सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या १० लाखांच्या पार गेलेली असेल. अनियोजित लॉकडाऊन एका व्यक्तीच्या अहंकाराचा परिणाम आहे ज्यामुळे करोना देशभरात फैलावला गेला, असं काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय.
उल्लेखनीय म्हणजे, करोना संकटकाळा दरम्यान संसदेत आजपासून १८ दिवसांच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होतेय. यावेळी संदेत चीनची घुसखोरी, देशासमोरील आर्थिक आव्हानं यासंबंदी मोदी सरकारला घेरण्याचा प्रयत्न विरोधकांकडून केला जाणार असल्याचं दिसतंय.
विरोधकांकडून सभागृहात अनेक विषयांवर चर्चा करण्याची संधी मिळण्याची मागणी केली जातेय तर दुसरीकडे सरकारचा मात्र जवळपास दोन डझन विधेयके संमत करण्यावर भर आहे
उल्लेखनीय म्हणजे, राहुल गांधी संसद अधिवेशनाच्या सुरुवातीच्या काही दिवसांत चर्चेत सहभागी होणार नाही. ते आपली आई आणि काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्यासोबत परदेशात आहेत. काँग्रेसनं जाहीर केल्यानुसार, सोनिया आपल्या वार्षिक मेडीकल चेकअपसाठी परदेशी रवाना झाल्या आहेत. त्यांच्यासोबत आईची काळजी घेण्यासाठी राहुल गांधीही त्यांच्यासोबत आहेत. ७३ वर्षीय सोनिया गांधी यांना जवळपास दोन आठवडे परदेशात राहावं लागू शकतं. त्यामुळे संसद अधिवेशनाच्या जवळपास ५० टक्के चर्चेत त्या सहभागी होऊ शकत नाहीत. राहुल मात्र एक-दोन दिवसांत मायदेशात परणार असल्याचं समजतंय. परदेशी रवाना होण्यापूर्वी राहुल गांधी यांनी शुक्रवारी संरक्षण संबंधी संसदीय समितीच्या बैठकीत सहभाग घेतला.
सोनिया गांधी यांच्यासोबत राहण्यासाठी आणि काळजी घेण्यासाठी पक्षाच्या महासचिव प्रियांका गांधी वाड्रा या सोनियांजवळ पोहचताच राहुल गांधी भारतात परणार असल्याचं समजतंय. सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या अनुपस्थितीबद्दल पक्षातील ज्येष्ठ नेत्यांना अगोदरच माहिती देण्यात आलीय.