कोल्हापुर- मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने (supreme court) स्थगिती दिल्यानंतर मराठा समाजाच्या विविध संघटना एकवटल्या असून त्या आक्रमक झाल्या आहेत. या आक्रमक संघटनांचा राज्य सरकारविरोधातील संताप आज, शुक्रवारी आंदोलनाच्या रूपात ठिकठिकाणी दिसला. राज्यात विविध ठिकाणी आंदोलने सुरू झाली आहेत. काही ठिकाणी दगडफेक करण्यात आली.
मराठा आरक्षणाला स्थगिती देण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा(supreme court)निर्णय जाहीर होताच मराठा समाजातून त्याबाबत संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होण्यास सुरुवात झाली. गुरुवारी रात्रीच काही प्रमुख नेत्यांनी पुढील रणनीती ठरविण्यासाठी ऑनलाईन बैठकही घेतली. मात्र युवकांतून संतप्त भावना व्यक्त करण्यात येत होत्या. शुक्रवारी सकाळी राज्यातील काही जिल्ह्यांत याबाबतच्या संतप्त भावनांना वाट करून देत आंदोलनादरम्यान दगडफेकीचे प्रकार घडले.
सांगली जिल्ह्यात लोकप्रतिनिधींना जाब विचारण्यात येणार आहे. त्यासाठी येत्या रविवारी बैठक घेण्यात येणार आहे.
सातार्याचे खासदार उदयनराजे यांनी ‘आरक्षण अबाधित ठेवा, अन्यथा परिणाम भोगा’, असा महाविकास आघाडी सरकारला खणखणीत इशारा दिला आहे. तर मराठा आरक्षणावरील स्थगिती तातडीने उठवावी, अन्यथा आंदोलन झाले तर मराठा समाजाला जबाबदार धरू नका, असे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी म्हटले आहे.
कोल्हापुरात दसरा चौकात राजर्षी शाहू छत्रपतींच्या पुतळ्याजवळ सकल मराठा समाजाच्या वतीने आंदोलन करण्यात आले. तीन दिवसांत सरकारने शैक्षणिक व नोकर्यांतील आरक्षणाची जबाबदारी न उचलल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला.