Kolhapur Rain And Flood News And Update
कोल्हापूर जिल्ह्यातील पंचगंगा नदीसह इतर नद्यांनी इशारा पातळी ओलांडली असून पुराच्या पाण्याने धोक्याची पातळी गाठली आहे. कोल्हापूर शहराला धोक्याचा इशारा देणारा रेडेडोह फुटला आहे. परिणामी चिखली, आंबेवाडी, केर्ली या गावांसह कोल्हापूर शहरातील नागरिकांचे स्थलांतर सुरू झाले आहे. खबरदारीसाठी जिल्हा प्रशासनाच्या मदतीला एनडीआरएफच्या दोन तुकड्या जिल्ह्यात दाखल झाल्या आहेत.
गुरुवारी सकाळपासून शहर व परिसरात पावसाचा जोर कमी झाला असला तरी धरण क्षेत्रात पावसाचा जोर कायम आहे. राधानगरी धरण ९९ टक्के भरल्याने कोणत्याही क्षणी धरणाचे स्वयंचलित दरवाजे उघडतील अशी परिस्थिती आहे. जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत गगनबावडा तालुक्यात 243 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.
एनडीआरएफची दोन पथके
कोल्हापूर जिल्ह्यासाठी NDRF च्या आणखी दोन टीम पुण्याहून रवाना. कोल्हापूर जिल्ह्यात NDRF च्या एकूण 6 टीम कार्यरत राहणार आहेत. जिल्ह्यातील विविध भागात NDRF ची पथकं उद्या रवाना होणार.
9 राज्य मार्गासह जिल्ह्यातील 34 मार्ग बंद; पर्यायी मार्गाने वाहतूक सुरु
आज सकाळी 9 वा. च्या अहवालानुसार जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील 9 राज्यमार्ग व 25 प्रमुख जिल्हा मार्ग असे एकूण 34 मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. पर्यायी मार्गाने वाहतूक वळविण्यात आली असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहाय्यक अधीक्षक अभियंता श्रीधर घाटगे यांनी दिली.