आनंदवार्ता! भारतात दाखल होणार रशियन लस

करोनाच्या संसर्गाला अटकाव करण्यासाठी रशियाने विकसित केलेली ‘स्पुटनिक व्ही’ ही लस भारतात दाखल होणार आहे. याच महिन्यात ही लस भारतात येणार आहे. या लशीची अंतिम टप्प्यातील चाचणी भारतातही होणार आहे. रशियाने करोनाच्या संसर्गाला अटकाव करणारी विकसित केलेली लस ही प्रभावी आणि सुरक्षित असल्याचे समोर आले आहे. लस चाचणीच्या पहिल्या दोन टप्प्यात ही लस अतिशय सुरक्षित असल्याचे आढळले आहे. लस उत्पादन करण्यासाठी निधी जमवणारी संस्था रशियन डायरेक्ट इनवेस्ट फंडचे सीईओचे किरील दिमित्री यांनी सांगितले की, या लशीची क्लिनिकल चाचणी भारतासह युएई, सौदी अरेबिया, फिलिपीन्स आणि ब्राझीलमध्ये होणार आहे. तिसऱ्या टप्प्यातील लस चाचणीचा प्राथमिक अहवाल ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये जाहीर करण्यात येणार आहे.

रशियात सामान्य नागरिकांना लस देणार!

रशियाने विकसित केलेली ‘स्पुटनिक व्ही’ ही करोनावरील लस सर्वसामान्य नागरिकांसाठी उपलब्ध होणार आहे. या आठवड्यांपासून ही लस देण्यात येणार आहे. रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांनी ११ ऑगस्ट रोजी या लशीला मंजुरी दिली असल्याची घोषणा केली होती. या लशीला मॉस्कोच्या गामलेया रिसर्च इन्स्टिट्यूटने संरक्षण मंत्रालयासोबत विकसित केली आहे. मेडिकल वॉचडॉग असणाऱ्या Roszdravnadzor संस्थेमध्ये गुणवत्तेची तपासणी होणार आहे. त्यानंतर या आठवड्यात ही लस सामान्यांसाठी उपलब्ध होण्याची शक्यता आहे.

भारतासह इतर देशात विकसित होणार लस

रशियन लशीचे उत्पादन रशियासह भारत, दक्षिण कोरिया, ब्राझील, सौदी अरेबिया, तुर्की आणि क्युबामध्ये करण्यात येणार आहे. त्याशिवाय या लशीची क्लिनिकल चाचणी भारतासह युएई, सौदी अरेबिया, फिलिपीन्स आणि ब्राझीलमध्ये होणार आहे. रशियाने लशीची अधिकृत घोषणा केल्यानंतर २० देशांनी मागणी नोंदवली होती.

या वर्षाखेर २० कोटी डोस निर्मितीची तयारी

या महिन्यापासून रशियात लशीचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन केले जाणार आहे. या वर्षअखेरपर्यंत ‘स्पुटनिक व्ही’चे २० कोटी डोसचे उत्पादन करण्यात येणार आहे. यामध्ये तीन कोटी डोस हे फक्त रशियन नागरिकांसाठी असणार आहेत. रशियन वृत्तसंस्था TASS ने रशियन अॅकेडमी ऑफ सायन्समधील उप संचालक असलेल्या डेनिस लोगुनोव यांच्या हवाल्याने सांगितले की, स्पुटनिक व्ही लशीला आता व्यापक उपयोगासाठी जारी करण्यात येणार आहे. काही दिवसांत या लशीची चाचणी सुरू होणार आहे. त्यानंतर काही दिवसांत लस वापरासाठी परवानगी मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.

…म्हणून लशीला स्पुटनिक नाव

रशियाने करोनावरील लशीला ‘स्पुटनिक व्ही’ (sputnik-v) असे नाव दिले आहे. ‘स्पुटनिक’ हा समाजवादी सोव्हिएत रशियन महासंघाने अवकाशात सोडलेला जगातील पहिला उपग्रह होता. त्यानंतर आता रशियाने करोनाला अटकाव करणारी जगातील पहिली लस विकसित केली आहे. रशियन लस ‘स्पुटनिक’ ही गमालोया रिसर्च इन्स्टिट्यूट आणि संरक्षण मंत्रालयाने संयुक्तरीत्या विकसित केली आहे.

लस कशी काम करते?

रशियन लस ही सामान्यत: सर्दी निर्माण करणाऱ्या adenovirus या विषाणूवर आधारीत आहे. या लशीची निर्मिती आर्टिफिशल पद्धतीने करण्यात आली आहे. करोनाचा विषाणू SARS-CoV-2 मध्ये आढळणाऱ्या स्ट्रक्चरल प्रोटीनची नक्कल करते. त्यामुळे शरीरात एक रोगप्रतिकारक शक्ती निर्माण होते. लस चाचणीच्या पहिल्या दोन टप्प्यात ही लस अतिशय सुरक्षित असल्याचे आढळले आहे. रशियाची स्पुटनिक व्ही ही लस टोचल्यानंतर ४२ दिवसानंतरही कोणतेही गंभीर साइड इफेक्टस जाणवले नाहीत. त्याशिवाय ही लस २१ दिवसांत शरिरात अॅण्टीबॉडी तयार करण्यास सक्षम असल्याचे नुकतेच समोर आले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!