नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्येत राम मंदिर भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडला. तब्बल 3 दशकांच्या संघर्षानंतर अखेरीस हा दिवस उजाडल्यामुळे देशभरात आनंदाचं वातावरण आहे. पर्णकुटीत राहणाऱ्या रामलल्लाचे भव्य मंदिर उभं राहणार असल्याचं नरेंद्र मोदी यांनी भूमिपूजनानंतर झालेल्या भाषणादरम्यान सांगितलं. या निमित्ताने सोशल मीडियावरही आज अनेक सेलिब्रेटी राम मंदिराच्या भूमिपूजनाबद्दल आनंद व्यक्त करत आहेत.
यामध्ये भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफ यानेही राम मंदिर भूमिपूजनाबद्दल आनंद व्यक्त केलाय. गंगा-जमुना यांसारखी संस्कृती असलेल्या शहरात मी वाढलोय. मला रामलीला पाहयला खूप आवडथं. या निमित्ताने द्वेष पसरवणाऱ्यांना थारा देऊ नका. भगवान श्रीराम यांच्यासाठी सर्वजण प्रिय होते, आपणही त्यांचा वारसा पुढे चालू ठेवायला हवा, असं कैफ म्हणाला आहे.
कैफप्रमाणे भारताचा स्टार खेळाडू सुरेश रैनानेही राम मंदिर भूमिपूजनाच्या निमित्ताने संदेश दिला. रैनाने सोशल मीडियावर लिहिलंय की, “रामजन्मभूमी अयोध्येत भव्य राम मंदिराच्या भूमिपूजपन झाल्याबद्दल देशवासियांना अभिनंदन. देशातील बंधुता आणि शांतता, शांती आणि आनंद वाढविण्याची माझी इच्छा आहे.”
तर सलामीविर फलंदाज शिखर धवन म्हणतो, “आजचा दिवस हा सेलिब्रेशनचा दिवस आहे. हा दिवस इतिहासाच्या पानांमध्ये नोंदविला जाईल. यामध्ये सहभागी झालेल्या प्रत्येकाचं अभिनंदन.”