मुंबई : उपसभापती निलम गोऱ्हे यांची मुदत संपली आहे. त्यामुळे हे पद रिक्त झाले. आता या पदासाठी पुन्हा निवडणूक होणार आहे. सध्याचे अंकगणित पाहता महाविकास आघाडी आणि अपक्ष या माध्यमातून आमदार संख्या जास्त असल्याने पुन्हा निलम गोऱ्हे यांना संधी मिळण्याची शक्यता अधिक आहे.
कोरोनामुळे गेल्या सहा महिन्यांपासून बंद पडलेले विधिमंडळाचे कामकाज अखेर सुरू झाले आहे. पावसाळी अधिवेशनाला आज सुरुवात झाली आहे. सभापती रामराजे निंबाळकर यांनी उपसभापतीपदाच्या निवडणुकीची घोषणा केली आहे. उपसभापतीपदाची निवडणूक ही उद्या मंगळवारी होणार आहे.
ग्रामपंचायत सुधारणा विधेयकाला विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी आक्षेप घेतला. ग्रामपंचायत प्रशासक नेमणुकीबाबत उच्च न्यायालयाने निर्णय दिला असताना पुन्हा हे विधेयक का? जो वाद न्यायालयात आहे त्यावर अध्यादेश काढायची घाई का? असा सवाल उपस्थितीत केला होता.
दरम्यान, विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाचा आजचा पहिलाच दिवस हा वादळी ठरला आहे. ग्राम पंचायतीमध्ये प्रशासक नेमणूक करण्यात आली होती. त्याबद्दल सुधारणा विधेयक मांडण्यात आले. परंतु, भाजपने या विधेयकावर जोरदार आक्षेप घेतला.
तर ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी फडणवीस यांचा दावा खोडून काढला. तुमची माहिती अपूर्ण आहे. 5 वर्ष सरपंच कसा यावा, याबाबत नियम आहे. पण 5 वर्षांनंतर काय करावं याबाबत कायदा नाही, असं हसन मुश्रीफ यांनी सांगितले. परंतु, विरोधकांनी जोरदार गोंधळ करत सभात्याग केले.