मुंबई : विधिमंडळाचे कामकाज आजपासून सुरू झाले आहे. राज्यातील सर्व आमदार विधान भवनात हजर होत आहे. विधिमंडळाच्या गेटवर येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची स्वॅब घेऊन रिपोर्ट दिले जात आहे. पण, स्वॅब घेऊनही काही आमदारांना रिपोर्ट न दिल्यामुळे एकच गोंधळ उडाला होता.
गेल्या सहा महिन्यांपासून लॉकडाउनमुळे राज्यातील सर्व व्यवहार ठप्प झाले होते. याचा फटका मंत्रालयीन कामकाजाला सुद्धा बसला होता. अखेर विधिमंडळाचे कामकाज आता सुरू झाले आहे. पण पहिल्याच दिवशी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले.
टेस्ट करून 24 तास झाले पण रिपोर्ट मिळत नाही. त्यामुळे आम्हाला अधिवेशनात जाता येत नाही, या सरकारने काही एजंट ठेवले का रिपोर्ट मिळेल का, असा सवाल करत माजी अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांनी नाराजी व्यक्त केली. त्यांच्यासोबत सेनेच्या आमदारांनीही आपली अडचण बोलून दाखवली.
त्याचवेळी अजित पवार हे तिथे पोहोचले. हरीभाऊ बागडे यांनी झालेला प्रकार अजितदादांच्या कानी घातला. त्यानंतर विधिमंडळाच्या गेटवरच अजितदादांनी अधिकाऱ्यांना चांगलेच खडसावून काढले. असं कसे काम चालणार आहे, आमदारांचे रिपोर्ट दिले नाहीतर ते आतमध्ये जातील कसे? ताबडतोब सर्व आमदारांचे चाचणी झालेले रिपोर्ट द्या आणि सर्वांना आतमध्ये सोडा, असे आदेशच अजित पवारांनी अधिकाऱ्यांना दिले.
अजितदादांनी आपल्या स्टाईलने फटकारून काढल्यामुळे कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची एकच धावपळ उडाली. सर्व आमदारांचे रिपोर्ट तातडीने देण्यात आले. त्यानंतर सर्व आमदार हे विधिमंडळात पोहोचले.
दरम्यान, विधिमंडळाच्या दारावर वैद्यकीय प्रवेशासाठी असलेले प्रादेशिक आरक्षण अट रद्द करा या मागणीसाठी मराठवाड्यतील काही आमदारांनी घोषणाबाजी केल. याबाबत तातडीने सर्व अधिकारी यांना बोलवा आणि बैठक लावतो असं सांगत अजित पवार यांनी या आमदारांना आश्वासन दिलं.