आदित्य ठाकरेंचीही ड्रग टेस्ट करा; ‘या’ नेत्याची मागणी

मुंबई: सुशांतसिंह राजपूत प्रकरणाच्या निमित्तानं हिंदी चित्रपटसृष्टीतील अंतर्गत वादही उफाळून आले आहेत. या प्रकरणात ड्रग रॅकेटचीही चर्चा असल्यानं त्यावरूनही टीका-टिप्पणी सुरू झाली आहे. सुशांत प्रकरणात बॉलिवूडमधील काही मंडळींना व मुंबई पोलिसांना लक्ष्य करणारी अभिनेत्री कंगना राणावत हिनं काही अभिनेत्यांची ड्रग टेस्ट करण्याची मागणी केली आहे. तोच मुद्दा उचलून धरत माजी खासदार नीलेश राणे यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना लक्ष्य केलं आहे.

सुशांत प्रकरणात कंगना राणावत हिनं सुरुवातीला बॉलिवूडमधील घराणेशाही व कंपूशाहीवर हल्लाबोल केला होता. मात्र, या प्रकरणाला राजकीय वळण लागल्यानंतर तिनं मुंबई पोलीस व राज्य सरकारवर टीका सुरू केली होती. आता या प्रकरणात ड्रग अँगल समोर आल्यानंतर तिनं बॉलिवूडमधील काही अभिनेत्यांना लक्ष्य केलं होतं. रणवीर सिंह, रणबीर कपूर, अयान मुखर्जी आणि विकी कौशल यांनी ड्रग टेस्ट करून घ्यावी, अशी मागणी तिनं केली होती. हे चौघे कोकेनच्या आहारी गेल्याच्या चर्चा आहेत. त्यांनी टेस्ट करून ह्या अफवांना उत्तर द्यावं. असं करून ते लाखो तरुणांसमोर एक उदाहरण ठेवू शकतात, असं ट्वीट तिनं केलं होतं. कोणत्याही कलाकाराला राष्ट्रीय पुरस्कार देण्यापूर्वी त्याची ब्लड टेस्ट करावी, असंही ती एका मुलाखतीत म्हणाली होती.
कंगनाच्या ह्याच मागणीच्या अनुषंगानं नीलेश राणे यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. ‘केवळ रणवीर आणि रणबीरच कशाला? आदित्य ठाकरे यांनीही ड्रग टेस्ट करावी. शेवटी बॉलिवूडमधील अंतर्गत वर्तुळात त्यांचाही वावर असतो,’ असं नीलेश राणेंनी म्हटलं आहे.


सुशांत प्रकरणात नीलेश राणे हे सातत्यानं आदित्य ठाकरे यांच्यावर टीका करत आहेत. त्यांच्यावर संशय व्यक्त करत आहेत. भाजपचा कुठलाही मोठा नेता आदित्य यांचं थेट नाव घेत नसला तरी नीलेश राणे यांनी अनेकदा थेट नाव घेऊन त्यांच्यावर टीका केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!