फडणवीसांना आणखी एक धक्का, ‘आरे’ची जमीन जंगल घोषीत करणार – आदित्य ठाकरे

मुंबई 2 सप्टेंबर:  मुंबईतल्या आरे मधल्या मेट्रो कार शेडचा निर्णय आता बारगळणार हे स्पष्ट झालं आहे. आरेमधली 600 एकर जमीन ही जंगल म्हणून घोषीत करण्याचा निर्णय झाला असल्याची माहिती राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली. त्यामुळे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी प्रतिष्ठेचा केलेला मेट्रो कार शेडची जागा आता बदलविण्यात येणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. एखाद्या महानगराच्या मध्यभागी अशा रीतीने विस्तीर्ण जंगल फुलविण्याचे संपूर्ण जगातील हे पहिलेच उदाहरण ठरणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

आदित्य ठाकरे म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात आज एक बैठक घेतली या बैठकीला आरे, वन आणि पर्यावरण मंत्रालयाचे अधिकारी उपस्थित होते. भारतीय वन कायद्याच्या कलम 4 नुसार राज्य सरकार आरेमधली 600 एकर जागा जंगल म्हणून घोषीत करणार आहे. त्यामुळे इथल्या आदिवासींचे हक्का कायम राखले जातील असंही त्यांनी सांगितलं.

राखीव वन क्षेत्राचा निर्णय घेताना आदिवासी समुदाय तसेच इतर संबंधितांचे योग्य हक्क अबाधित ठेवावेत असेही मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिले.

राखीव वन क्षेत्राबाबत कलम 4 लावण्यात येऊन त्यानुसार 45 दिवसांच्या कालावधीत नागरिकांकडून सूचना आणि हरकती मागवण्यात येतील. त्या सूचना व हरकती ऐकून घेऊन त्यानुसार वनामधून वगळायचे क्षेत्र निश्चित करण्यात येईल.

सर्व प्रकारची बांधकामे, रस्ते, झोपड्या आणि आदिवासी पाडे तसेच इतर शासकीय सुविधा या पहिल्या टप्प्यातून वगळण्यात येतील.

त्याचबरोबर येथील झोपड्यांचे पुनर्वसनही तातडीने सुरू केले जाईल. या संपूर्ण कार्यवाहीच्या पहिल्या टप्प्याचा प्रस्ताव हा वन विभागामार्फत लवकरच सादर करण्यात येणार आहे. या निर्णयामुळे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान तसेच आरे येथील वनसंपदा संरक्षित होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!