नवी दिल्ली: ज्येष्ठ विधिज्ञ आणि कार्यकर्ते प्रशांत भूषण यांना न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी (Contempt of Court case against Prashant Bhushan) सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) १ रुपयाचा दंड ठोठावला आहे. प्रशांत भूषण यांनी हा दंड १५ सप्टेंबरपर्यंत न भरल्यास त्यांना तीन महिन्याचा तुरुंगावास आणि तीन वर्षांपर्यंत न्यायालयात वकिली करण्यावर बंदी घालण्यात येईल असे कोर्टान म्हटले आहे.
सुप्रीम कोर्टाने ने आपला निर्णय देताना ‘हे’ म्हटले
प्रशांत भूषण यांनी आपल्या वक्तव्याला प्रसिद्धी दिल्यानंतर कोर्टाने या प्रकरणाची दखल घेतली, असे न्यायमूर्ती अरुण मिश्रा यांच्या नेतृत्वातील न्यायमूर्ती बी. आर. गवई आणि न्यायमूर्ती कृष्ण मुरारी यांच्या पीठाने म्हटले आहे. भूषण यांनी उचललेले पाऊल चुकीचे असल्याचे कोर्टाने आपल्या निकालात म्हटले आहे.
माफी न मागण्यावर अडून राहिले होते प्रशांत भूषण
२५ ऑगस्टला सुनावणीदरम्यान माफी मागण्यात गैर काय आहे, काय हा शब्द इतका वाईट आहे, असे सुप्रीम कोर्टाने म्हटले होते. आपण माफी मागणार नाही अशी ठाम भूमिका प्रशांत भूषण यांनी घेतली होती. मी माझ्या ट्विटवर ठाम असून, त्यासाठी मी माफी मागणार नाही, असे आपली बाजू मांडताना प्रशांत भूषण यांनी म्हटले होते. प्रशांत भूषण यांनी आपल्या भूमिकेवर पुनर्विचार करावा आणि माफी मागावी असे सुप्रीम कोर्टाने म्हटले होते. प्रशांत भूषण यांनी चोरी किंवा खून केलेला नाही, हे लक्षात घेता त्यांना शहीद बनवू नये, असे भूषण यांची बाजू मांडणारे वकील राजीव धवन यांनी म्हटले होते.
या पू्र्वी कोर्टाने या प्रकरणी २५ ऑगस्टला त्यांना ठोठवायच्या शिक्षेबाबत आपला निर्णय राखून ठेवला होता. प्रशांत भूषण यांना शिक्षा ठोठावण्याच्या मुद्द्यावर कोर्टाने अॅटर्नी जनरल के. के. वेणुगोपाळ यांचा सल्ला मागितला होता. त्यावर प्रशांत भूषण यांना समज देऊन सोडून दिले पाहिजे, असे वेणुगोपाळ यांनी म्हटले होते.
या प्रकरणी ज्येष्ठ विधीज्ञ प्रशांत भूषण यांनी न्यायालयात माफी मागण्यास नकार दिला होता. ट्विट करत त्यांनी आपली ही भूमिका जाहीर केली होती. न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी जास्तीतजास्त सहा महिन्यापर्यंतची कैद किंवा दोन हजार रुपये दंड किंवा दोन्ही अशी शिक्षा दिली जाऊ शकते.