तर पक्ष फुटेल-संजय निरुपम

नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष पदासाठी निवडणूक झाली तर पक्षच फुटण्याची शक्यता असल्याचं विधान पक्षाचे नेते संजय निरुपम (sanjay nirupam) यांनी केलंय. पक्षात निवडणूक झाली तर लोकप्रियतेमुळे राहुल गांधी (rahul gandhi) निवडणूक जिंकतील, हे निश्चित आहे परंतु, पक्षात फूट पडेल, असा इशाराही संजय निरुपम यांनी दिलीय. या ट्विटद्वारे संजय निरुपम यांनी अध्यक्ष पदासाठी निवडणुकीचा घोषा लावणाऱ्या पक्षातल्या नेत्यांवर निशाणा साधलाय.

‘काँग्रेसमध्ये ज्या संघटनात्मक निवडणुकीची काही नेते गप्पा करत आहेत, देशातल्या किती राजकीय पक्षांमध्ये अशा निवडणुका घेतल्या जातात? आजच्या परिस्थितीत काँग्रेस अध्यक्ष पदासाठी निवडणूक घेणं घातक आहे. निवडणुका झाल्या तर लोकप्रियतेमुळे राहुल गांधी यांचाच निश्चित विजय होणार परंतु, पक्षात मोठी फूट पडेल’ असं ट्विट संजय निरुपम यांनी केलंय.

हे वाचा : ..तर माझ्या पाठीत मीच खंजीर खुपसल्यासारखे होईल

दुसरीकडे, ‘पक्षात निवडणुका झाल्या नाही तर पुढची ५० वर्ष काँग्रेसला विरोधी बाकावरच बसावं लागेल. काँग्रेसमध्ये एक टक्के लोकांनाही नियुक्त केलेला अध्यक्ष नकोय’, असं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद (gulam nabi azhad) यांनी म्हटलंय. एएनआयशी बोलताना आझाद यांनी हे वक्तव्य केलं. काँग्रेस कार्यसमितीच्या बैठकीपूर्वी सोनिया गांधींना लिहिणाऱ्या २३ नेत्यांच्या पत्रावर स्वाक्षरी करणाऱ्यां नेत्यांमध्ये गुलाम नबी आझाद यांचं नाव प्रामुख्यानं समोर आलं होतं. ‘निवडणुकीला जे विरोध करत आहेत त्यांना पदं आपल्या हातून निघून जाण्याची भीती वाटतेय’ असंही आझाद यांनी म्हटलं होतं.

‘तत्वांच्या लढाईत विरोध ऐच्छिक’

तसंच ‘तत्त्वांची लढाई असते, त्या वेळी विरोध हा नेहमी ऐच्छिक असतो आणि समर्थन हे बहुधा व्यवस्थापित (मॅनेज) केलं जातं,’ असं मत ज्येष्ठ काँग्रेस नेते कपिल सिब्बल (kapil sibbal) यांनी याअगोदर व्यक्त केलं होतं. काँग्रेस पक्षात व्यापक संघटनात्मक बदलासाठी आणि पूर्ण वेळ अध्यक्षांच्या मागणीसाठी हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी (soniya gandhi) यांना पत्र लिहिणाऱ्या २३ काँग्रेस नेत्यांमध्ये त्यांचाही समावेश होता. सिब्बल आपल्या ‘ट्वीट’मध्ये म्हणतात, ‘जीवनात, राजकारणात, न्यायासाठी, सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये, सोशल मीडियाच्या मंचावर जेव्हा तत्त्वांसाठी लढाई होते, त्यावेळी विरोध हा नेहमी ऐच्छिक असतो. मात्र, समर्थन हे बहुधा व्यवस्थापित असते’ काँग्रेस पक्षात व्यापक संघटनात्मक बदलासाठी आणि पूर्णवेळ अध्यक्षांच्या मागणीसाठी हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांना सिब्बल यांच्यासह २३ काँग्रेस नेत्यांनी लिहिलेल्या वादग्रस्त पत्राच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हे ‘ट्वीट’ केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!