..तर माझ्या पाठीत मीच खंजीर खुपसल्यासारखे होईल

तुकाराम मुंडे यांचा बदली नंतर उद्वेग

मुंबई : मी गेल्या काही वर्षांत आक्रमकपणा कमी केला, स्वत:च्या स्वभावाला मुरड घातली, पण यापुढेही माझ्या कितीही बदल्या झाल्या तरी मी आयुष्यात तत्त्वांशी तडजोड करणार नाही. तत्त्वांना तिलांजली दिली तर ते माझ्या पाठीत मीच खंजीर खुपसल्यासारखे होईल, अशी भावना व्यक्त करतानाच नागपूर महापालिका आयुक्तपदावरून माझी बदली व्हावी, असा मी काय गुन्हा केला होता, असा सवाल सनदी अधिकारी तुकाराम मुंडे यांनी पत्रकारांशी बोलताना केला.

नागपुरात माझ्याविरोधात कुठलेही मुद्दे मिळत नाहीत म्हटल्यानंतर माझ्या चारित्र्यहननाचे प्रकार घडविण्यात आले. महिलांना माझ्याकडे पाठवून कपडे फाडून घेण्याचे प्रकार घडले,असा गौप्यस्फोट मुंडे यांनी केला. दररोज माझ्याविरुद्ध आरोप केले जात होते, पद्धतशीरपणे मला टार्गेट करण्यात आले. माझे मानसिक खच्चीकरण करण्याचे प्रयत्न चारपाच महिने झाले. असे का करण्यात आले? त्यात भाजपचे लोक होते, दुसरे कोण करणार? असा सवाल मुंडे यांनी केला. मुंडे सध्या कोरोनाग्रस्त असून नागपुरात होम क्वारंटाइन आहेत. तिथून त्यांनी संवाद साधला.

मी जिल्हाधिकारी वा आयुक्त म्हणून जिथेही गेलो तिथे प्रस्थापित राजकारण्यांनी मला विरोध केला, त्यात वेगवेगळ्या पक्षांचे नेते होते; पण जनतेने माझे स्वागतच केले. मी कोणाच्याही विरोधासाठी वा बाजू घेण्यासाठी कामच करत नाही. शासकीय अधिकारी म्हणून नि:पक्षपणे काम करतो. सिव्हील सर्व्हंट म्हणून तो माझा रोल आहे. सत्तेच्या मागे धावणे हा आमचा रोल नसतो, काही लोक ते करतात. मी घटनेच्या चौकटीत लोकाभिमुख काम करतो. शासनाचा अधिकारी म्हणून मी काम करतो. याचा अर्थ मी कुण्या पक्षाच्या इशाऱ्यावर काम करत नाही. असे मी स्वत:चे कधीही होऊ दिलेले नाही. पण माझ्या चारित्र्यहननापर्यंतचे प्रकार घडले हे वेदनादायी आहे. सर्वपक्षीय नेते माझ्याविरोधात एकवटले असे मला नाही वाटत. तसे चित्र निर्माण करण्यात आले. भाजप मुख्यत्वे विरोधात होता. मला राजकीय विश्लेषण करायचे नाही.

पाच साडेपाच महिने कोरोनातच गेले. देशात केल्या नाहीत अशा कोरोनासंबंधीच्या उपाययोजना मी केल्या. पाच हॉस्पिटल्स रेकॉर्ड वेळेत सुरू केले. बऱ्याच जणांचे जीव वाचविले. एनजीओंशी समन्वयातून अनेक गोष्टी केल्या. स्वतंत्र मलनि:स्सारण व्यवस्था उभी केली. नागनदी दरवर्षी साफ करून पैसा खर्च करण्यापेक्षा कायाकल्प करण्यावर भर दिला.

सात महिन्यांत मी नागपुरात रिझल्ट दिले. सरकारने बदलीचा आदेश दिला आहे, पण खरं सांगू? लोकांचा थेट संबंध असलेल्या संस्थांमध्ये काम करणे मला नेहमीच आवडेल. प्रत्येक ठिकाणी किमान दोन वर्षे तरी मिळाली पाहिजेत. कारण समाजात असंख्य नागरी प्रश्न आहेत आणि कुठलाही दबाव सहन न करता काम करणाऱ्या अधिकाऱ्यांची तेवढीच आवश्यकता आहे. माझे आई-वडील शेतकरी आहेत. जेवढं लोकांचं भलं करता येईल तेवढं करत राहा, एवढं सोपं तत्वज्ञान त्यांनी मला दिलं. त्यानुसार मी चालत राहीन.

नागपुरात अनेक गोष्टी होत्या. अनावश्यक बाबी मी बंद केल्या. पावसाळ्यात साडेतीनशे टँकर चालायचे. मी ते निम्म्याहून कमी केले. लोक माझ्यावर खूश का आहेत तर कॉर्पोरेशन इतके चांगले काम करू शकते हे लोकांना पहिल्यांदाच दिसले. म्हणून माझ्या बदलीचा लोक निषेध करताहेत. राजकीय बळी गेला यावर मी भाष्य करणार नाही, मी राजकारणी नाही. मी कोणत्याही नेत्यावर आरोप करणार नाही. जे पटले नाही ते मी आधीही बोललो आहे. मी लोकांसाठीच काम करतो, पण माझीच बदली वारंवार का केली जाते, असा मी काय गुन्हा केला, याचे उत्तर मला मिळत नाही, अशी खंत तुकाराम मुंडे यांनी व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!