अंबाजोगाई | प्रेम विवाह केलेल्या लेकावर नाराज असलेल्या पित्याने लेक आणि सून गावाकडे आल्यानंतर त्यांना घरात का घेतले म्हणून पत्नी सोबत वाद केला आणि तो रागाने घरातून बाहेर पडला. परंतू आपल्या सुने विरूद्धचा राग त्याच्या मनात घर करून होता. काल अखेर रागाच्याभरात सासर्याने सूनेच्या मानेवर कुर्हाडीने घाव केले. पत्नी आडवी आली असता तीही जखमी झाली. सासर्याच्या खूनी हल्ल्यात सून जागीच ठार झाली. ही खळबळजनक घटना अंबाजोगाई तालुक्यातील पट्टीवडगाव येथे रात्री घडली. या प्रकरणातील खूनी सासरा पोलीसांनी गजाआड केला आहे.
हे वाचा :पुण्यात मास्क न वापरल्यास होऊ शकतो एवढा दंड!
पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार शीतल अजय लव्हारे (वय २५) मयत महिलेचे नाव आहे. गुरुवारी (दि.27) रात्री साडेनऊच्या सुमारास तिचा सासरा बालासाहेब संभाजी लव्हारे याने कुऱ्हाडीने तिच्यावर गळ्यावर वार केल्याची प्राथमिक माहिती आहे. या हल्ल्यात शीतलचा जागीच मृत्यू झाला. तर, शीतलची सासू देखील या घटनेत जखमी झाल्याचे समजते. उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांनी मध्यरात्री घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. दरम्यान, हल्ल्यानंतर सासरा फरार झाला होता. पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे. अशी माहिती पोलीस उपअधीक्षक राहुल धस यांनी दिली.