या मंत्र्यांनी केली या दोन जिल्ह्यात दारू विक्री सुरु करण्याची मागणी

मुंबई : गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यात लागू करण्यात आलेली दारूबंदी उठविण्यात येवून या दोन जिल्ह्यांमध्ये पुन्हा दारू विक्री सुरू करण्यात यावी अशी मागणी चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी अशी लेखी पत्राद्वारे राज्य उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे-पाटील व गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे केली आहे.

गडचिरोली जिल्ह्यात अगोदर दारूबंदी करण्यात आली. मात्र पोलीस विभागासह प्रशासनाकडून यावर कठोर कार्यवाही होत नसल्यामुळे गडचिरोली जिल्ह्यात मोठया प्रमाणात अवैध दारू व बनावट दारू विक्री केली जात आहे. या अवैध दारु विक्रीमुळे गुन्हेगारीत मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. असे असताना सुध्दा गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेला लागून असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात पाच वर्षांपूर्वी दारूबंदी लागू करण्यात आली. चंद्रपूर जिल्ह्यात दारू बंदी लागू झाल्यानंतर या जिल्ह्यात सुध्दा दिवसरात्र बिनदिक्कत पणे मोठ्या प्रमाणात अवैध दारू व बनावट दारू विक्री सुरू झाली. या अवैध दारू विक्रीमध्ये तरुण मुले, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा समावेश असून या तरुण पिढीचे आयुष्य उध्वस्त होत आहे. हजारो कुटुंबाचे संसार सुध्दा उध्वस्त होत आहे. तर अनेकांचा बळी सुध्दा गेलेले आहे. तसेच दारू माफियाकडून कर्तव्यदक्ष पोलीस अधिकाऱ्याची हत्या करण्यात आली होती.

या दोन्ही जिल्ह्यात फक्त नावाचीच दारूबंदी असून दाम तिपटीने अवैध रित्या दिवसरात्र मोठ्या प्रमाणात खुलेआम दारूची विक्री होत आहे. यामुळे राज्याचा करोडो रुपयाचा महसूल सुध्दा बुडत आहे.यासर्व पार्श्वभूमीवर चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी प्रशासनाच्या माध्यमातून चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी सुरू ठेवावी की उठवावी याबाबत मत मागितले असता ८० टक्के लोकांनी दारू सुरू करावी असे मत व्यक्त केले.

या दोन्ही जिल्ह्यात दारूबंदी मुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा विचार करून राज्याचे मंत्री विजय वडेट्टीवार यांनी चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात दारू पुन्हा सुरू करावी अशी लेखी पत्राद्वारे राज्य उत्पादन शुल्क मंत्री वळसे-पाटील व गृहमंत्री देशमुख यांच्याकडे केली असून यावर चर्चा करण्यासाठी तातडीने बैठक घ्यावी अशी मागणी केली आहे. त्यामुळे चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील अवैध दारू विक्रीला आळा घालण्यासाठी पुन्हा दारू विक्री सुरू होणार काय अशी चर्चा नागरिकांत सुरू झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!