दोन वर्षांनंतर उत्तराखंडमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत जनता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाने मते देणार नाही, असे त्यांनी म्हटले.
डेहराडून -उत्तराखंड भाजपचे अध्यक्ष बन्सीधर भगत यांनी पक्षाच्या आमदारांना चांगली कामगिरी करण्यासाठी प्रोत्साहित करताना भलतेच वक्तव्य केल्याने राजकीय सनसनाटी निर्माण झाली आहे.
उत्तराखंडमध्ये भाजपची सत्ता आहे. त्या राज्यात 2022 मध्ये होणारी निवडणूक जिंकून सत्ता राखण्याचे लक्ष्य भाजपने निश्चित केले आहे. त्याविषयी पत्रकारांशी बोलताना भगत यांनी अनेकांच्या भुवया उंचावणारे वक्तव्य केले. ते म्हणाले, भाजपचे तिकीट वाटप कामगिरीच्या आधारे होईल.
विधानसभा मतदारसंघांमध्ये कठोर मेहनत घेण्याची सूचना मी पक्षाच्या आमदारांना केली आहे. मोदींच्या नावावर जनतेने पुष्कळदा मते दिली. पुढील निवडणुकीत तसे घडणार नाही. आमदारांची कामगिरीच त्यांना मते मिळवून देईल. मोदींमुळे आपली नाव किनाऱ्याला लागेल असा विचार कुणी करू नये, अशी पुस्ती त्यांनी जोडली. त्यातून भाजप आमदारांनी चांगले कार्य करावे, असे त्यांना म्हणायचे होते.
मात्र, भूमिका मांडताना भाजप प्रदेशाध्यक्षांनी नेमकेपणाने शब्दप्रयोग न केल्याने त्यांची आणि त्यांच्या पक्षाची खिल्ली उडवण्याची आयतीच संधी कॉंग्रेसला मिळाली. योग्य वक्तव्य केल्याबद्दल आम्ही भगत यांचे अभिनंदन करतो. मोदी लाट ओसरल्याचे त्यांनी मान्य केले आहे, अशी प्रतिक्रिया प्रदेश कॉंग्रेसकडून देण्यात आली.