उद्धव ठाकरे यांनी संजय जाधव यांना फोन करुन समजूत काढण्याचा प्रयत्न केला असल्याची माहिती समोर येत आहे. तसेच परभणीतील स्थानिक पातळीवर पक्षाशी संबंधित काय समस्या आहेत, यावर देखील उद्धव ठाकरेंनी संजय जाधवांशी चर्चा केली. जिंतूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा प्रश्न सोडवला जाईल. तो तितका फारसा मोठा प्रश्न नाही, अशी समजूत घालून खासदारकीचा राजीनामा मागे घेण्याची सूचना उद्धव ठाकरे यांनी संजय जाधव यांना दिली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या मनधरणीने संजय जाधव राजीनामा मागे घेणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
संजय जाधव यांना यासंबंधित विचारले असता त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे. मी वरिष्ठांशी प्रत्यक्ष बोलल्यानंतर माध्यमांशी बोलणार, असं संजय जाधव यांनी स्पष्ट केलं आहे
दरम्यान, जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेत यापूर्वी टोकाचा विरोध होता. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर दोन्ही पक्षातील नेत्यांनी जमवून घेतले होते, असे असले तरी अंतर्गत नाराजीचा सूर गेल्या काही महिन्यांपासून सुरू आहे. अशातच जिल्हा नियोजन समितीच्या निधीचे वितरण, विविध अशासकीय समित्यांवरील नियुक्ती आदींच्या कारणावरून शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दुही निर्माण झाल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसकडून जिल्ह्यात गळचेपी होत असल्याच्या कारणावरून बुधवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे राजीनामा दिल्याचे सूत्रांनी सांगितले.