आज होणार मोठा निर्णय : कोण सांभाळणार काँग्रेस ची कमान

नवी दिल्ली, 24 ऑगस्ट : कॉंग्रेसमधील नेतृत्त्वावरुन सुरू झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी पक्षाची मोठी बैठक होणार आहे. आज सकाळी 11 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून काँग्रेस कार्यकारिणीची बैठक (CWC) होणार असून त्यामध्ये नेतृत्वाच्या प्रश्नावर मोकळेपणाने चर्चा होऊ शकते अशी माहिती देण्यात आली आहे. वरिष्ठ नेत्यांनी काँग्रेसचा अध्यक्ष बदलावा अशी पत्राद्वारे कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना मागणी केल्यानंतरच ही CWC ची ही बैठक होत आहे. त्यामुळे काँग्रेसमध्ये लवकरच मोठा बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आता पक्षाध्यक्षपदी रहाण्याची इच्छा नाही असं सोनिया गांधी म्हणाल्या आहेत. त्यामुळे आजच्या या बैठकीत सोनिया गांधी अंतरिम अध्यक्षपदाचा राजीनामा देऊ शकतात असं राजकीय चर्चा सुरू आहे. CWC च्या या बैठकीत कॉंग्रेस नेतृत्वासह इतर प्रश्नांवरही गांधी कुटुंबियांकडून चर्चा होऊ शकते. तर ‘मी अंतरिम अध्यक्षपदाचा 1 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला आहे आणि आता पक्षाध्यक्षपदाचा पद सोडायचा आहे’ अशी माहिती सोनिया गांधी यांनी नेत्यांना दिली आहे. त्यामुळे आजच्या बैठकीत काँग्रेसची कमान कोणाकडे जाते हे पाहणं महत्त्वाचं आहे.

या बैठकीसाठी CWC चे सदस्य, यूपीए सरकारमधील मंत्री असलेले नेते आणि खासदार अशा किमान 23 नेत्यांनी काँग्रेस नेतृत्त्वावर सोनिया गांधी यांच्याशी चर्चा होणार आहे. काँग्रेस पक्षाला मोठं करण्यासाठी आणि पक्षाच्या प्रगतीसाठी काँग्रेस अध्यक्ष बदलण्याची मागणी करण्यात आली होती. त्यावर उत्तर म्हणून ही महत्त्वाची बैठक होणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.

दरम्यान, जर सोनिया गांधी यांनी राजीनामा देण्याचं ठरवलं तर पुढे काय असा प्रश्न उपस्थित होतो. अशात दोन मुद्द्यांवर चर्चा होऊ शकते. पहिलं तर CWC ने सोनिया गांधींचा राजीनामाच स्वीकारू नये. त्यांनी अध्यक्षपद सांभाळावं यासाठी दबाव आणावा. अशात सोनिया गांधी आरोग्याचंही कारण पुढे करू शकतात. त्यामुळे सूरतमधील काही ज्येष्ठ नेत्यांना अध्यक्ष बनवण्यावर चर्चा होऊ शकते.

तर दुसरा मुद्दा म्हणजे सोनिया गांधी यांचा राजीनामा स्विकारत CWC च्या वतीने राहुल गांधींना पुन्हा अध्यक्षपदासाठी अपील करण्यात येईल. अशात जर बैठकीमध्ये या दोन्ही परिस्थितीवर सकारात्मक चर्चा झाली नाही तर गांधी घराण्याव्यतिरिक्त अध्यक्षांच्या नावावर चर्चा होऊ शकते. पण याची शक्यता कमी असल्याचंही बोललं जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!