नवी दिल्ली: काँग्रेसच्या २३ ज्येष्ठ नेत्यांनी पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांना पत्र लिहून पक्षात मोठा बदल करण्याची मागणी केली आहे. या नेत्यांमध्ये काँग्रेस कार्यकारिणीतील अनेक सदस्यांसह पाच माजी मुख्यमंत्री, अनेक खासदार आणि माजी केंद्रीय मंत्र्यांचा समावेश आहे. काँग्रेस पक्ष आपला जनाधार आणि युवकांचा विश्वास गमावत चालला असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे. नेतृत्वावर प्रश्न उपस्थित करत या नेत्यांनी एक पूर्णवेळ आणि प्रभावी नेतृत्वाची मागणी केली असल्याचे पत्रात नमूद केले आहे. या नेत्याने केवळ आपले कामच न करता लोकांमध्ये उतरून काम केले पाहिजे, अशीही मागणी केली आहे. या व्यतिरिक्त CWC ची निवडणूक घेण्यात यावी, तसेच पक्षाला पुन्हा उभारी आणण्यासाठी धोरण आखण्यात यावे अशीही मागणी करण्यात आली आहे. (
काँग्रेस नेत्यांनी मांडल्या समस्या
> राज्य काँग्रेसचे अध्यक्ष, पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्यांमध्ये विनाकारण विलंब.
> सन्मान आणि जनाधार असलेल्या नेत्यांना राज्यांमध्ये पाठवले जात नाही.
> राज्य प्रमुखांना संघटनेत निर्णय घेण्याचे अधिकार नाहीत.
> युवक काँग्रेस आणि NSUIमध्ये निवडणुकीने संतुलत बिघडले
‘गांधी-नेहरू कुटुंब काँग्रेससाठी महत्त्वाचे’
लोकशाहीच्या संवर्धनासाठी पक्ष मजबूत असणे अत्यंत आवश्यक आहे, असे नेत्यांनी म्हटले आहे. देश सर्वात वाईट राजकीय, आर्थिक आणि सामाजिक संकटात असताना काँग्रेस पक्ष कमजोर झालेला आहे, असे पत्रात लिहिण्यात आले आहे. लोकसभा निवडुकीत पराभव झाल्यानंतर एका वर्षांनंतरही पक्षाने आत्मपरीक्षण केलेले नाही, असे नेत्यांनी म्हटलेले आहे. नेहरू-गांधी कुटुंब नेहमीच पक्षाचे महत्त्वाचे घटक राहिलेले आहेत, असेही नव्या नेतृत्वाची मागणी करताना नेत्यांनी पत्रात म्हटले आहे.
काँग्रेस नेत्यांच्या मागण्या
> नेतृत्वात स्थायी आणि प्रभावी बदल व्हावेत
> CWC च्या निवडणुका घेतल्या जाव्यात
> पक्षाची हरवलेली शक्ती पुन्हा प्राप्त करण्यासाठी धोरण आखण्यात यावे
> संघटनेच्या प्रत्येक स्तरावर निवडणुका व्हाव्यात
> संसदीय पक्ष मंडळाची निर्मिती व्हावी
> प्रदेश काँग्रेस समित्यांना अधिकार द्यावेत
पत्रात कोणकोणत्या नेत्यांच्या सह्या?
सोनिया गांधी यांना पाठवण्यात आलेल्या पत्रात राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आजाद यांच्या व्यतिरिक्त माजी केंद्रीय मंत्री आनंद शर्मा, कपिल सिब्बल, मनीष तिवारी, शशी थरूर, खासदार विवेक तनखा, AICC आणि CWC चे मुकुल वासनिक आणि जितिन प्रसाद यांची नावे आहेत. या व्यतिरिक्त माजी मुख्यमंत्र्यांमध्ये भूपिंदरसिंह हुड्डा, राजेंद्र कौर भटट्ल, एम. वीरप्पा मोइली, पृथ्वीराज चव्हाण, पी. जे. कुरियन, अजय सिंह, रेणुका चौधरी और मिलिंद देवडा यांच्याही पत्रावर सह्या आहेत. प्रदेश समित्यांची जबाबदारी सांभाळलेले राज बब्बर, अरविंदरसिंह लवली आणि कौल सिंह यांनी देखील पत्राचे समर्थन केले आहे. तसेच अखिलेश प्रसाद सिंह, कुलदीप शर्मा, योगानंद शास्त्री आणि संदीप दीक्षित यांच्या देखील सह्या आहेत.