उत्तर प्रदेश पोलीस आणि वाद हे काही नवीन नाही. मग तो विकास दुबे असो व हे प्रकरण. या सर्व कारणांनी योगी सरकार वरती प्रश्न चिन्ह उभे होतात.सध्या उत्तर प्रदेशमधील गोविंद नगर पोलिसांबद्दल संताप व्यक्त करणाऱ्या एका तरुणीचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. उत्तर प्रदेशमधील कानपूरजवळील दुबाऊलीमधील गोविंद नगर येथे राहणाऱ्या तरुणीने घरमालकाच्या पुतण्यासंदर्भात तक्रार केली. यानंतर पोलिसांनी आरोपीवर कारवाई करण्याऐवजी मला पोलीस स्थानकात डान्स करण्याचा सांगितल्याचा आरोप या १६ वर्षीय मुलीने केला आहे. यासंदर्भातील वृत्त आयएएनएस वृत्तसंस्थेनं दिलं आहे.
भाड्याने घरात राहणाऱ्या या मुलीचे कुटुंब जागरण गोंधळ करुन उदर्निवाह करते. काही दिवसांपूर्वी घर मालकाचा पुतण्या आणि या मुलीच्या कुटुंबामध्ये वाद झाला. यावेळी घरमालकाच्या पुतण्याने मुलीची छेड काढली तसेच कुटुंबाला घर सोडण्यासाठी सांगून त्यांचे सामान घराबाहेर फेकून देऊ लागल्याची तक्रार कुटुंबाने पोलिसांकडे केली आहे. या मुलीच्या आईने दिलेल्या माहितीनुसार आरोपीचे नाव अनुप यादव असे आहे. आरोपीने २६ जुलैच्या रात्री जबदस्तीने आमच्या घरात प्रवेश करुन हिंसा केल्याचा आरोप मुलीच्या आईने केला आहे. “२६ जुलै रोजीच्या प्रकारानंतर ७ ऑगस्टच्या रात्री माझी मुलगी बाजारामधून घरी येत असतानाच घरमालकाच्या पुतण्याचे तिची छेड काढली. त्यानंतर आम्ही गोविंद नगरचे पोलीस निरीक्षक अनुराग मिश्रा यांच्याकडे तक्रार करण्यासाठी गेलो. तर त्यांनी माझ्या मुलीली आधी नाचून दाखव त्यानंतरच आम्ही तक्रार (एफआयआर) दाखल करुन घेऊ असं सांगितलं,” अशी माहिती मुलीच्या आईने दिली आहे.