आपल्या सर्वांचे आधार, ज्येष्ठ नेते, माजी आमदार आदरणीय श्री सुधाकर पंत परिचारक यांचे काल रात्री साडे अकराच्या (11.35 PM)सुमारास पुण्याच्या सह्याद्री हॉस्पिटलमध्ये कोरोनामुळे दुःखद निधन झाले.
मुंबई – सोलापूर जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार सुधाकरपंत परिचारक याचे पुण्यात निधन झाले आहे. पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान सोमवारी रात्री 11.35 वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला, ते 85 वर्षांचे होते. सुधाकरपंत परिचारक यांना कोरोनाची लागण झाल्याने त्यांच्यावर पुण्यातील खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते.
‘आपल्या सर्वांचे आधार, ज्येष्ठ नेते, माजी आमदार आदरणीय श्री सुधाकर पंत परिचारक यांचे काल रात्री साडे अकराच्या (11.35 PM)सुमारास पुण्याच्या सह्याद्री हॉस्पिटलमध्ये कोरोनामुळे दुःखद निधन झाले. गेले 2 दिवस ते ventilatory support (कृत्रिम श्वासोश्वास) वर होते. त्यांचे सर्व अंत्यविधी कोरोनाच्या नियमावलीत पुणे येथे पार पडतील. सोलापूर जिल्ह्यात पसरलेल्या त्यांच्या व्यापक कुटुंबाला, जनसामान्यांना हे दुःख पचवण्याची ईश्वर ताकद देवो, त्यांचा जनसेवेचा यज्ञ असाच पुढे चालू ठेवुयात, अशी फेसबुक पोस्ट त्यांचे नातू प्रतिश प्रशांत यांनी आज सकाळी केली आहे. त्यानंतर, पंढरपूर तालुक्यासह सोलापूर जिल्ह्यावर शोककळा पसरली.
सुधाकरपंत परिचारक यांचा परिचय
सुधाकरपंत परिचारक यांनी 2019 मध्ये शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार म्हणून पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवली होती. मात्र राष्ट्रवादीचे उमेदवार भारत भालके यांच्याकडून त्यांचा पराभव झाला.
सुधाकरपंत परिचारक हे दहा वर्ष राष्ट्रवादीचे आमदार होते. 2009 मध्ये सुधाकरपंत परिचारक यांना पक्षाकडून विधानसभेची उमेदवारी जाहीरही झाली होती. मात्र ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते पाटील यांच्यासाठी पंतांनी उमेदवारी मागे घेतली. परंतु मोहिते पाटलांना पराभवाचा सामना करावा लागला.
गेल्या दहा वर्षांच्या काळात सुधाकरपंत निवडणुकांपासून लांब राहिले. पंचाहत्तरी गाठल्यानंतर इतरांना संधी देण्यासाठी सुधाकरपंतांनी ‘बॅक टू पॅव्हेलियन’ करणं पसंत केलं होतं. 2014 च्या निवडणुकीपासून परिचारकांनी राष्ट्रवादीसोबतही काडीमोड घेतला. मात्र कार्यकर्त्यांचा जोश पाहून गेल्या वर्षी सुधाकरपंतांनी विधानसभा निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवली. सुधाकरपंत हे भाजपचे सहयोगी आमदार प्रशांत परिचारक यांचे चुलते आहेत. त्यामुळे भाजपकडून निवडणूक लढण्यासाठी कार्यकर्त्यांनी आग्रह धरला. भाजपने तिकीट न दिल्यास अपक्ष लढा, असेही कार्यकर्त्यांचे म्हणणे होते, मात्र भाजपने त्यांना तिकीट दिल्याने सुधाकरपंत रिंगणात उतरले.