सोलापूर : दुधाला वाढीव अनुदान आणि दर देण्याची मागणी घेऊन स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आज पुन्हा एकदा सोलापुरात आंदोलन केलं. या आंदोलनादरम्यान रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष यांच्यावर देखील राजू शेट्टी यांनी यावेळी निशाणा साधला. “खरा शेतकरी हा तुम्हाला स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या झेंड्याखाली दिसेल. आंदोलन यशस्वी करण्याची क्षमता फक्त स्वाभिमानी शेतकरी संघटनेत आहे.” तर सदाभाऊ खोत यांच्यासोबत येण्याच्या चर्चावरुन राजू शेट्टी यांनी जोरदार टीका केली.
“फालतू आणि भामट्या लोकांना आम्ही सोबत घेत नाही’’ असा जोरदार टोला राजू शेट्टी यांनी सदाभाऊ खोत यांच्यावर लगावला. तर “अजित नवले यांनी हिशोब द्यावा’’ अशी देखील प्रतिक्रिया राजू शेट्टी यांनी दिली. काही दिवसांपूर्वी रयत क्रांती संघटनेच्यावतीने देखील दूध दर संदर्भात आंदोलन पुकारण्यात आलं होतं. वेगवेगळी आंदोलन करण्यापेक्षा एकत्रित येऊन आंदोलन का केलं जात नाही असा प्रश्न पत्रकरांनी विचारला त्यावरून राजू शेट्टी यांनी सदाभाऊ खोत यांच्यावर ही टीका केली.
अजित नवले यांनी दुध डेअऱ्या राजकीय नेत्यांच्या असून त्यांच्या फायद्यासाठी हे सर्व सुरु असल्याची टीका केली होती. त्यावरुन राजू शेट्टी यांनी त्यांना प्रत्युत्तर दिलं. तर सध्या माझ्यासमोर केवळ दूध दराचा मुद्दा आहे. त्यानंतर आमदारकीचा विचार करु, अशी प्रतिक्रिया देखील राजू शेट्टी यांनी यावेळी दिली.
देशातील ऊस क्षेत्र कमी करण्यासंदर्भात निती आयोगाने केंद्राकडे शिफारस केलीय. मात्र यावरुन देखील राजू शेट्टी टीका केलीय. ऊसाचे क्षेत्र कमी झाले पाहिजे मात्र निती आयोगाने केलेली शिफारस म्हणजे रोगापेक्षा इलाज भयानक असे वक्तव्य राजू शेट्टी यांनी केले आहे. निती आयोगामध्ये बसलेले विद्वान हे उंटावरचे शहाणे आहेत. त्यांना काही अक्कल नाहीये. त्यांनी सुचवलेलं आहे की उस कमी केलं तर 6 हजार रुपये अनुदान देण्यात यावं. मात्र या अनुदानाकडे कोणीही बघणार नाही.
निती आयोगाने आणखी एक शिफारस केली आहे की एकूण पिकवलेल्या उसापैकी 85 टक्के उस स्विकारा आणि 15 टक्के ऊस शेतात राहू द्यावं. ही शिफारस म्हणजे एका व्यक्तीचे वजन वाढल्यानंतर त्याचे हात पाय तोडा आणि वजन कमी करा, असा हा सल्ला असल्याची टीका राजू शेट्टी यांनी केली. ऊसाचे क्षेत्र कमी करायचे असल्यास सोयाबीन, डाळीचे पीक सारख्या पीकांना हमीभाव द्या. त्यांच्या खरेदीची सोय करा. त्यातून शास्वत उत्पानाची व्यवस्था करा. ऊस हे सुरक्षित पीक असल्याने शेतकरी त्याकडे वळतात. असा सल्ला देखील स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी यावेळी दिला.