जायकवाडीत २० हजार क्युसेसने पाण्याची आवक ; पाच दिवसांत पाणीपातळीत पाच टक्क्याने वाढ


पैठण- जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात व वरील भागात पावसाचा जोर कायम असून होत असलेल्या संततधार पावसामुळे व वरील भागातील धरणातून सोडण्यात येत असलेल्या पाण्यामुळे जायकवाडी धरणाच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत असून पाच दिवसांत पाणीपातळीत पाच टक्क्यांची वाढ झाली आहे. सध्या धरणात २० हजार क्युसेस या वेगाने पाण्याची आवक होत आहे. धरणाची पाणीपातळी ६३.२१ टक्क्यांवर पोहचली आहे. सध्या धरणात नागमठाण, देवगड-मधमेश्वर, शिवना, ढोरा नदी, खामनदी मधुन धरणात पाण्याची जोरदार आवक होत आहे. जायकवाडी धरणाच्या पाणलोट जोरदार पर्जन्यवृष्टी होत असल्याने पाण्याची पातळी झपाट्याने वाढत आहे. रविवारी सायंकाळी सहा वाजता जायकवाड़ी धरणाची पाणीपातळी १५१४.६० फुट म्हणजे ४६१.६५१ मीटर इतकी नोंदली गेली. धरणात  २० हजार क्युसेक या वेगाने पाण्याची आवक सुरु आहे. १५२२ फुट पाणी साठवण क्षमतेच्या “नाथसागर” मध्ये रविवारी सायंकाळी सहा वाजता  १५१४. ६० फुट पाण्याची नोंद झाली. या धरणात सध्या एकूण पाणीसाठा  २११०.४५१ दलघमी तर जिवंत पाणीसाठा १३७२.३४५ दलघमी इतका होता‌.  धरणाची टक्केवारी ६३.३१ इतकी होती. धरणात पाण्याची जोरदार आवक सुरु झाल्याने लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाचे (कडा) अधिक्षक अभियंता व प्रशासक राजेंद्र काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक कार्यकारी अभियंता शिवप्रसाद खेडकर, शाखा अभियंता संदिप राठोड, बुध्दभुषण  दाभाडे, गणेश खराडकर, बंडु अंधारे, पी एस खर्चे, निलेश तायडे, व्ही पी काकडे, आर जे गायकवाड आदी अधिकारी व कर्मचारी परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.     वरच्या भागातील धरणांच्या पाणी पातळीतही सुधारणा!
गेल्या आठवड्यात नाशिक अहमदनगर सह जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील बहुतेक सर्व लहान मोठ्या पाणी प्रकल्पांची पातळी पावसाचा मोठा कालावधी उलटून गेल्या नंतरही चिंता करायला लावणारा होता. त्यामुळेच संपूर्ण मराठवाड्यासाठी वरदान ठरलेले  जायकवाडी धरण यंदाच्या पावसाळ्यात पुर्ण क्षमतेने भरणार की नाही आशी परिस्थिती निर्माण झाली होती. तथापि, चालू आठवड्यात झालेल्या समाधानकारक पावसाने पून्हा या संदर्भातील आशा पल्लवित झाल्या असून पाणलोट क्षेत्रातील विद्यमान पाणी पातळीत सुधारणा होत आहे. यातील काही धरणाची पाणी पातळी या प्रमाणे  करंजवन -३४%, पालखेड- ६५%,गंगापूर- ७६%,दारणा-  ९१%,भावली- १००,नांदूर-मधमेश्वर-  ७२%, मुळा- ६१%,निळवंडे-७२%, भंडारदरा- ९३%. यातील काही धरणातुन जायकवाडी धरणात पाण्याचा विसर्ग सुरु आहे.


पैठण तालुक्यात सर्वदूर संततधार! 
पैठण तालुक्यात यंदा सुरूवातीपासूनच समाधानकारक पाऊस पडल्याने खरीप हंगामातील कापूस, तूर, सोयाबीन, मूग आदी पिके चांगलीच बहरली असून तालुक्यातील गोदावरी नदीवरील आपेगाव व हिरडपूरी ही दोन्ही बंधारेही याच दमदार पावसाच्या भरवशावर तुडूंब भरली आहेत. विशेष म्हणजे गत चार दिवसांपासून पैठण तालुक्यातील पैठण, पिंपळवाडी पि., बीडकीन, ढोरकिन, बालानगर, नांदर, आडूळ, पाचोड, लोहगाव, विहामांडवा या आकरा  महसूल मंडळात संततधार पावसाने हजेरी लावून बळीराजाला आणखी दिलासा दिला आहे.  तालुक्यात  आतापर्यंत सरासरी ५७१.९० मिली मिटर पाऊस पडल्याची नोंद झाली असल्याची माहीती तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी दिली आहे. 
 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!