सोशल मीडियाचा पुरेपूर वापर करून भाजप सत्तेत कसा आला हे सर्वज्ञात आहे. सोशल मीडिया हे आत्ताच जनतेपर्यंत किंवा मतदारांपर्यंत पोहोचण्याचा योग्य साधन आहे याची चाहूल भाजपच्या बड्या नेत्यांना लागली होती. तरुणांना आपलस करण्यासाठी आणि आपले अजेंडा तरुणांपर्यंत पोहोचविण्यासाठी सोशल मीडियाचा सर्वच राजकीय पक्ष वापर करतात.
भारतात लोकप्रिय असलेल्या फेसबुकच्या धोरणाबद्दल द वॉल स्ट्रीट जर्नलनं धक्कादायक खुलासा केला आहे. द्वेष आणि हिंसेला प्रोत्साहन देणाऱ्या पोस्टवर कडक कारवाई करणाऱ्या फेसबुकनं भाजपा नेते आणि संबंधित काही ग्रुपबद्दल नरमाईची भूमिका घेतल्याचं समोर आलं आहे. व्यावसायिक वृद्धीच्या हेतूमुळे फेसबुकनं हिंसेला प्रोत्साहन देणाऱ्या भाजपा नेत्यांच्या पोस्टवर कारवाईस नकार दिला आहे.
द वॉल स्ट्रीट जर्नलनं फेसबुकच्या कारवाई न करण्याबद्दलच्या भूमिकेचा गौप्यस्फोट केला आहे. फेसबुकच्या भारतातील वरिष्ठ कार्यकारिणीनं सत्ताधारी भाजपाशी संबंधित चार नेते आणि ग्रुप यांच्यावर द्वेष पसरवणाऱ्या पोस्ट संदर्भात असलेले नियम लागू करण्यास विरोध केला आहे. दुसरीकडे वस्तुस्थिती अशी आहे की, काही नेते आणि ग्रुप हिंसा भडकावण्यात आणि चिथावणी देण्यात सहभागी होते.
“भाजपा नेत्यांवर हिंसाचार पसरवणाऱ्या पोस्टवरून कारवाई केल्यास कंपनीच्या भारतातील व्यावसायिक वाढीला धोका निर्माण होऊ शकतो,” असं दास यांनी कर्मचाऱ्यांना सांगितल्याचं रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. जागतिक पातळीवर फेसबुक वापरकर्त्यांची संख्या भारतात सर्वाधिक आहे.
रिपोर्टमध्ये भाजपाच्या तेलंगानातील आमदार टी. राजा सिंह यांच्या द्वेष पसरवणाऱ्या पोस्टचा उल्लेख करण्यात आलेला आहे. या पोस्टमध्ये राजा हे अल्पसंख्याकांविरोधात हिंसा करण्याचं आवाहन करत आहेत. फेसबुकमध्ये सध्या कार्यरत असलेल्या आणि माजी कर्मचाऱ्यांनी सांगितलं की, “अंखी दास यांचा या प्रकरणातील हस्तक्षेप हा कंपनीनं सत्ताधारी पक्षाविषयी अनुकूलता दर्शवल्याचा व्यापक स्वरूपाचा भाग आहे.”
फेसबुकच्या अंतर्गत कर्मचाऱ्यांचं असं मत आहे की, कंपनीच्या धोरणानुसार आमदाराचं खात बंद करण्यात यावं, असं वॉल स्ट्रीट जर्नलच्या अहवालात असं म्हटलं आहे. यावर फेसबुकचे प्रवक्ते एंडी स्टोन यांनी भूमिका स्पष्ट करताना म्हटलं आहे की, “दास यांनी राजकीय पडसादांविषयी चिंता व्यक्त केली होती. पण, सिंह यांना फेसबुकवर बंदी न घालण्याची इतरही अनेक कारणं आहेत,” असं स्टोन यांनी सांगितलं.
रिपोर्टनुसार वॉल स्ट्रीट जर्नलनं फेसबुककडे याबद्दल विचारणा केली. त्यावर फेसबुकनं सिंह यांच्या पोस्ट डिलीट केल्या आहेत, असं सांगण्यात आलं. यासंदर्भात इंडियन एक्स्प्रेसनं टी. राजा सिंह यांच्याशी संपर्क केला. सिंह म्हणाले, “मी स्वतः पोस्ट करत नाही. ज्या पोस्टविषयी बोललं जात आहे, ते पेज खूप आधीच बंद करण्यात आलं आहे. फेसबुक त्यांचं अधिकृत पेज २०१८मध्येच बंद केलं. त्याविषयी आमच्याशी कोणतीही चर्चा केली नव्हती. देशभरात माझे समर्थक माझ्या नावानं पेज चालवतात, आम्ही त्यांना थांबवू शकत नाही. आमचं त्यांच्यावर कोणतंही नियंत्रण नाही,” असं सिंह यांनी सांगितलं.