बीड दि.15 (प्रतिनिधी): कोरोना महामारीच्या काळाात कोरोना संसर्ग होवू नये म्हणून, घरात राहा, सुरक्षित रहा आणि शासनाच्या नियमाचे पालन करावे. कोरोना विरूध्दची लढाई जिंकण्यासाठी घरात राहून भविकांनी परमेश्वराचे नामस्मरण करावे. नामस्मरण केल्याने आत्मनिर्भयता आणि आत्मबळ मिळते. सद्याच्या आपद्कालीन परिस्थितीमध्ये दीन-गरीब गरजुंना अन्नधान्य आणि आर्थिक मदत करून पुण्यकर्म करावे. सत्कर्म केल्यास जीवनात समाधान आणि शांतता मिळते, असे प्रतिपादन वारकरी सांप्रदायाचे गाढे अभ्यासक कीर्तनकार तथा संगित शिक्षक वाणीभूषण ह.भ.प. बलभीम महाराज राऊत यांनी केले.
यासंदर्भात ह.भ.प. बलभीम महाराज राऊत यांनी म्हटले आहे की, कोरोनाच्या संकटामुळे अवघे जग थांबले आहे. व्यवहार बंद पडल्याने, दैनंदिन दिनचर्या बदली आहे. या आपत्कालीन परिस्थितीमध्ये ध्यानधारणा, योग-प्राणायाम करून परमेश्वरांच्या नामस्मरणात वेळ घालावा. धार्मिक ग्रंथाचे वाचन आणि श्रवण करावे. मन, बुध्दी चित्त शुध्दीसाठी परमेश्वराचे नामस्मरण महत्वाचे साधन आहे. परमेश्वराचे नामस्मरण आणि चिंतन केल्याने आत्मनिर्भयता आणि आत्मबळ मिळते. मन आणि चित्त शुध्दीसाठी योग, ध्यानधारणा आणि नामस्मरण हे साधन आहे. शांतता, समाधान आणि आनंददायी जीवनासाठी नामस्मरण करावे, असे आवाहन ह.भ.प. राऊत महाराज यांनी केले आहे.
राऊत महाराजांचे प्रबोधन कोरोनामुळे लॉकडाऊन झाल्यापासून कीर्तन व प्रवचनकार ह.भ.प. बलभीम महाराज राऊत यांनी जय हनुमान संगीत विद्यालयाच्या मार्फत फेसबुक आणि वॉटस्अॅपच्या माध्यमातून विद्यार्थी, शिष्य आणि भाविकांशी संवाद साधून दैनंदिन आध्यात्मिक आणि संगीत विषयक धडे देणे सुरू आहे. ह.भ.प. बलभीम महाराज राऊत यांच्या धार्मिक आणि सामाजिक कार्याचा असंख्य भाविक आणि विद्यार्थ्यांना लाभ होत आहे.