सोशल मीडियावर मानहानिकारक पोस्ट शेअर केल्यामुळे संतप्त झालेल्या जमावाने मंगळवारी रात्री काँग्रेस आमदाराच्या घरावर हल्ला केला. बंगळुरुमध्ये ही घटना घडली. संतप्त जमावाने थेट आमदाराच्या घरात घुसून तोडफोड केली, गाडया पेटवून दिल्या. मोठया प्रमाणावर हिंसाचार केला. यावेळी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना गोळीबार करावा लागला. यामध्ये दोन जणांचा मृत्यू झाला आहे. या हिंसाचारामध्ये ६० पोलीसही जखमी झाले आहेत.
काँग्रेस आमदाराच्या एका नातेवाईकाने ही पोस्ट शेअर केली होती. त्यावरुन हा सर्व वाद निर्माण झाला. शहरातील डीजे हाल्ली आणि केजी हाल्ली पोलीस ठाण्याच्या हद्दीत या हिंसक चकमकी झाल्या. पोलिसांच्या गोळीबारात दोघांचा मृत्यू झाला असून जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती बंगळुरुचे पोलीस आयुक्त कमल पंत यांनी दिली. या हिंसाचारामध्ये अतिरिक्त पोलीस आयुक्तांसह ६० पोलीस जखमी झाले आहेत. बंगळुरुमध्ये कलम १४४ लागू करण्यात आले आहे. डीजे हाल्ली आणि केजी हाल्ली पोलीस ठाण्याच्या हद्दीत कर्फ्यू लावण्यात आला आहे. सोशल मीडियावर मानहानीकारक पोस्ट शेअर करणाऱ्या आरोपीला अटक करण्यात आली आहे अशी माहिती बंगळुरुचे पोलीस आयुक्त कमल पंत यांनी दिली. इंडिया टुडेने हे वृत्त दिले आहे.
या हिंसाचाराशी संबंधित ११० लोकांना अटक करण्यात आली असून अजून काही लोकांना अटक करण्यात येईल अशी माहिती बंगळुरु गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप पाटील यांनी दिली.